शासकीय योजनेतून अर्थसाह्य़ मिळवून देण्यासाठी निराधार महिलांकडे पैसे व लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या तहसीलदाराला येथील शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातच मारहाण करून त्याची विवस्त्र धिंड काढली. ईश्वर राणे असे या तहसीलदाराचे नाव आहे.
शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत महिलांना शासनाकडून मदत केली जाते. त्यासाठी काही कागदपत्रांच्या पूर्ततेची आवश्यकता असते. या सर्व प्रकरणांचा कार्यभार सांभाळण्यासाठी स्वतंत्र तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. राणे यांच्याकडे तेच काम सोपविण्यात आले होते. मात्र, राणे यांनी कार्यभार स्वीकारताच निराधार महिलांकडून त्यांच्याविरोधात तक्रारी येऊ लागल्या.  दाखल होणाऱ्या विविध प्रकरणांच्या मोबदल्यात पैसे तसेच लैंगिक सुखाची मागणी राणे यांच्याकडून होत असे. या तक्रारींची खात्री करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’चा आधार घेतला.  तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे आढळल्यानंतर गुरुवारी दुपारी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, नगरसेवक महेश मिस्तरी यांच्यासह महिला आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी राणे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच गाठले. महिला पदाधिकाऱ्यांनी राणे यांना मारहाण केली. राणे यांचे सर्व कपडे फाडून विवस्त्रावस्थेतच जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या दालनात नेण्यात आले. संतप्त महिला पदाधिकाऱ्यांनी राणे यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर महिला निघून गेल्या. सुमारे दीड तास राणे जिल्हाधिकारी कार्यालयातच बसून होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांमार्फत आणलेले कपडे राणे यांना परिधान करावयास लावले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात राणे विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा