लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, या निकालाच्या एक दिवस आधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेवर भाजपाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भातील माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून मागवली होती.

यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे. आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेबाबत तक्रार करताना आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांना मतदानाच्या दिवशी घेतलेली ती पत्रकार परिषद भोवण्याची चिन्ह आहेत.

हेही वाचा : राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून शरद पवार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला इशारा; म्हणाले…

पत्रकार परिषदेत काय आरोप केले होते?

राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये ज्या भागात शिवसेना ठाकरे गटाचे मतदान जास्त आहे, त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने पार पडत आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला होता. तसेच मतदानासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याबाबातही त्यांनी भाष्य केलं होतं. यानंतर भारतीय जनता पक्षाने यावर आक्षेप घेतला होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी भाजपा नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच काही ठिकाणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दामहून मतदानाला दिरंगाई करण्यात येत असल्याने मतदारांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “आशिष शेलारांची निवडणूक आयोगात जास्त ओळख असल्याचं यावरून दिसून येत आहे. त्यांनी एक शिफारस आमच्यासाठीही करावी, बीडमध्ये दमदाटी आणि पैसे वाटपाचे व्हिडीओ आम्ही शेअर केले. मात्र, निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही. आशिष शेलारांनी आमच्यासाठी आयोगाला शिफारस करावी”, असं सुषमा अंधारे यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“आम्ही आतापर्यंत निवडणूक आयोगाला अनेक पत्र लिहिले, त्यावर निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही. जी कारवाई करायची ती करुद्या आम्ही स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईच्या आदेशासंदर्भात माध्यमांशी बोलताना दिली.