गेल्या काही दिवसांपासून घराणेशाही घराणेशाही म्हणून आपल्यावर बोललं जातं आहे. मी पण ज्यांनी कुटुंब व्यवस्था नाकारली त्यांना घराणेशाही कशी कळणार? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसंच जालना लाठीचार्ज प्रकरणावरुनही उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. तसंच हुकूमशाही चिरडून टाकण्यसाठीच आम्ही इंडिया म्हणून एकत्र आल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी मोदींना टोला लगावला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
हुकूमशाही देशात आणणारा हुकूमशहा आम्हाला जन्मालाच येऊ द्यायचा नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. अनेक क्रांतिकारक फासावर गेले, अनेकांनी प्राणांची आहुती दिली त्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालं. आजही घराणेशाही-घराणेशाही म्हणत जो काही एक उद्घोष चालला आहे घराणेशाहीच्या आम्ही विरोधात आहोत असं सांगत आहेत. मी तुमच्या घराण्याबद्दल विचारतच नाही कारण तुम्हाला सांगायला घराण्याचा इतिहासच नाही. जे लोक कुटुंब व्यवस्था नाकारतात त्यांनी दुसऱ्याच्या घराणेशाहीवर बोलू नये. त्यांना तो अधिकारच नाही. कुटुंब व्यवस्था, घराणं ही आमच्या हिंदूंची संस्कृती आहे. तिच्या मुळावर तुम्ही घाव घालणार आणि आमच्या घराण्यावर बोलणार? आधी कुटुंब सांभाळा मग आमच्या घराण्यावर बोला. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
बाळासाहेबांचा तो किस्सा
या सरकारने आता गॅस सिलिंडर स्वस्त केला आहे. मला आजही आठवतं आहे २०१२ हे वर्ष होतं. तेव्हा सुषमा स्वराज यांनी मला फोन केला भारत बंद करायचा आहे. मी बाळासाहेबांना विचारलं, मला म्हणाले गणपतीच्या दिवशी? छट् त्यांना सांगून टाक आम्ही गणपतीचा सण असताना भारत बंद वगैरे काही आंदोलन करत नाही. त्याही वेळा गणपतीच्या दिवसात यांनी भारत बंद केला होता. मी त्या आंदोलनाला गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझा फोटो आला गॅस सिलिंडर हातात घेतलेला. त्यानंतर मला बाळासाहेबांनी मला झापलं अरे तुझी अँजिओप्लास्टी झाली आणि तू सिलिंडर कसा काय घेतलास हातात. बाळासाहेब माझ्यावर चिडलेच होते. मग मी त्यांना सांगितलं जरा थांबा माझं ऐका अहो तो थर्माकोलचा सिलिंडर होता असं मी बाळासाहेबांना सांगितलं. मग ठीक आहे असं बाळासाहेब मला म्हणाले. त्याही वेळा गॅस सिलिंडरचं आंदोलन गणपतीच्या दिवसात केलं होतं. त्यावेळी गॅसचा दर काय होता? आज काय आहे? बघा. पाच वर्षे लुटायचं आणि दोनशे रुपयांची सूट द्यायची. हे सगळे जुमले आहेत त्यावर यांनी इमले बांधले आहेत जे आपल्याला मोडून काढायचे आहेत.
काल परवा जी बैठक झाली तेव्हा एक-दोघांनी चिंता व्यक्त केली की भाजपाने डिसेंबर महिन्यात सगळी विमानं आणि हेलिकॉप्टर्स बुक केली आहेत. तेव्हा निवडणुका झाल्या तर काय करायचं? त्यावर मी म्हटलं निवडणुकांना सामोरं जायचं. कारण सामान्य माणसं आपल्या बरोबर आहेत. विमानं असोत की नसोत आपण जिंकणारच असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.