विहिरीची नोंद करण्यासाठी पंधरा हजार रुपये मिळूनही आणखी लाच खाण्याचा मोह तलाठय़ाला चांगलाच नडला. त्याच कामासाठी आणखी पाच हजार रुपये लाच घेताना अकलापूरचा तलाठी उत्तम दळवी याला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
आज सकाळी अकलापूरच्या तलाठी कार्यालयात नगरच्या पथकाने तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेताना दळवी यांना पकडण्यात आले. शेतातील विहिरीची नोंद करण्यासाठी तलाठी दळवी यांनी वीस हजाराची मागणी केली होती. संबंधिताने उसनवारी करून अगोदर दहा व नंतर पाच असे पंधरा हजार रुपये पोहोच केले होते. उरलेले पाच हजार मिळाल्याशिवाय नोंद करणार नसल्याचे फर्मावण्यात आल्यानंतर वैतागलेल्या तक्रारदाराने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार आज सापळा लावण्यात आला. त्यात लाच स्वीकारताना तलाठी दळवी यांना पकडून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा