काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अहमदनगरच्या जागेवरचा तिढा अद्यापही मिटलेला नाही. या जागेचा तिढा सुटत नसल्याने आघाडीचे जागावाटप जाहीर होऊ शकलेले नाही. मित्र पक्षांना जागा सोडल्यावर जागावाटप जाहीर केले जाईल, असे दोन्ही काँग्रेसचे नेते सांगत आहेत. नगरची जागा पुत्रासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिष्ठेची केली आहे. पवार आणि विखे-पाटील यांच्यातील वादाची किनार लक्षात घेता, राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही. नगरच्या जागेवरून दिल्लीत हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांकडे विनवणी केल्याचे समजते. यातूनच गेल्या शुक्रवारी अकलूज दौऱ्यावर पवारांनी नगरची जागा काँग्रेसला सोडण्याचे संकेत दिले. नगरची जागा कोणाला, या पत्रकार परिषदेतील प्रश्नावर पवारांनी काँग्रेस, असे उत्तर दिले. नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली, अशी बातमी सुरू झाली. पण त्याच दिवशी सायंकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडली असल्याचे वृत्त तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच नगरची जागा सोडण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असेही जयंतरावांनी स्पष्ट केले. आता राष्ट्रवादीत शरद पवारांचा निर्णय अंतिम की, अजित पवारांच्या सल्ल्याने जयंत पाटील सांगतात हे अंतिम, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे.
-मुंबईवाला