अतिवृष्टीनं तळीये गावात होत्याचं नव्हतं करून टाकलं. गुरूवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तळीये गावावरच दरड कोसळली. या ३५ पैकी ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याने गिळंकृत केली. अचानक ओढवलेल्या या संकटाने तळीये गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला. सध्या तळीये गावात मदत व बचावकार्य सुरू असून, एनडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली गाडलेल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी तळीये गावाला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर दुःखाने कोलमडून गेलेल्या ग्रामस्थांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर दिला. राज्यात परिस्थिती उद्भवत असून, जल आराखडा तयार करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
तळीये गावात अद्याप बचावकार्य सुरूच आहे. ४० पेक्षा अधिक माणसांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ५० हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२४ जुलै) दुपारी तळीये गावाला भेट दिली. मुंबईहून दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री तळीयेसाठी रवाना झाले. त्यानंतर साधारणः दीड ते दोन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःखात बुडालेल्या तळीयेवासियांचं सांत्वन करत धीर दिला.
संबंधित वृत्त- ज्याला अक्रीत म्हणावं तसं घडतंय, अनपेक्षित दुर्घटना घडत आहेत – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना दुर्घटना आणि मदत कार्याबद्दल माहिती दिली. माहिती घेत असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी हातात छत्री धरून स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन केलं.”तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू; सर्वांना मदत दिली जाईल. या दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं आहे. त्या सर्वांचं पुनर्वसन केलं जाईल, त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही स्वतःला सावरा बाकीची काळजी आम्ही घेऊ”, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोकग्रस्त नागरिकांना दिली.
आजकाल पावसाळ्याची सुरुवातही चक्रीवादळाने होते. अशा घटना पाहता डोंगर- उतार व कडे-कपाऱ्यांतील वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी जल आराखडा तयार केला जाईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 24, 2021
Video : रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड; व्हिडीओ आला समोर
“आजकाल पावसाळ्याची सुरुवातही चक्रीवादळाने होते. अशा घटना पाहता डोंगरउतार व कडेकपाऱ्यांतील वाड्या-वस्त्यांचं स्थलांतर करण्याचं नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळ्यात नद्यांचं पाणी वाढून पूर परिस्थिती उद्भवते आहे. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी जल आराखडा तयार केला जाईल”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जल आराखडा तयार करणार असल्याचं स्पष्ट केलं.