पुणे/ नारायणगाव : नाटक, सिनेमांना किमान पन्नास टक्क्यांच्या क्षमतेने परवानगी असताना करोना काळात संपूर्ण दोन वर्षे पूर्णत: बंद असलेला लोकनाटय़ तमाशा मरणासन्न अवस्थेला पोहोचला होता. मात्र, शिथिल झालेले निर्बंध आणि गावोगावीच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने राज्यातील तमाशांचे फड पुन्हा उभारी घेण्यास सज्ज झाले आहेत. त्याचीच नांदी सध्या तमाशा पंढरी नारायणगाव येथे दिसून येत आहे. यात्रा-जत्रांसाठी तमाशाची सुपारी घेण्यासाठी राज्यभरातील फडमालकांच्या राहुटय़ा (कार्यालय) दोन वर्षांनंतर प्रथमच येथे उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे ग्रामस्थ, स्थानिक पुढारी, पाटील, पंच, यात्रा उत्सव कमिटीचे प्रमुख यांची रेलचेल राहुटय़ांमध्ये सुरू होत आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे घातलेल्या निर्बंधात नाटक, सिनेमा आदींना काही प्रमाणात सूट मिळाली होती. पण, तमाशा पूर्णपणे बंद होता. करोनाच्या पहिल्या वर्षी दौऱ्यांसाठी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडताना अनेक फड मालक आर्थिक विवंचनेत सापडले.
कलाकारांवर तर उपासमारीची वेळ आली. तमाशाच नष्ट होतो की काय अशी स्थिती असताना निर्बंधात सूट मिळाली आणि यात्रा-जत्रांचा हंगामही आल्याने फड मालकांनी पुन्हा कलाकारांना हाक दिली आणि फड पुन्हा उभा केला. सुपाऱ्या मिळविण्यासाठी आता नारायणगावात धाव घेऊन तेथे राहुटय़ाही उभारण्यात आल्या. सरपंच योगेश पाटे यांच्या माध्यमातून अतुल कानडे, श्रीमती महाजन, हेमंत डोके यांच्या मालकीच्या सुमारे दोन एकर क्षेत्रात राहुटय़ांची विनामूल्य उभारणी करण्यात आलेली आहे.
या तमाशा राहुटय़ांचे वास्तव्य अक्षय तृतीयेपर्यंत राहणार आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये तमाशा पंढरीत सुमारे ३५ तमाशा फडांच्या राहुटयांचे आगमन झालेले असून यामध्ये विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे ,पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, मालती इनामदार, हरिभाऊ बढे सह शिवकन्या बढे नगरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर सह किरणकुमार ढवळपुरीकर, भिका-भीमा सांगवीकर, अंजलीराजे नाशिककर, संध्या माने, आनंद जळगावकर, काळू-बाळू लोकनाटय तमाशा मंडळ, शांताबाई सम्रापूरकर, प्रकाश अहिरेकर, जगनकुमार सह हौसा वेळवंडकर, बाळ आल्हाट नेतवडकर, छाया खिलारे, दीपाली सुरेखा पुणेकर, काळू-नामू येळवंडकर, स्वाती शेवगावंकर, दत्ता महाडिक पुणेकर, संभाजी संक्रापूरकर, कांतीलाल पाटील सह मीरा पुणेकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर, सविता पुणेकर आदी तमाशाच्या राहुटय़ा उभारण्यात आलेल्या आहेत.
तमाशाबाबत दुजाभाव का?
राज्य शासनाने तमाशाला परवानगी दिली असता काही जिल्ह्यात स्थानिक पोलीस अधिकारी तमाशा कार्यक्रमांना, यात्रा कमिटींना परवानगी देत नाहीत. राजकीय सभा, मेळावे, प्रचारसभा, निवडणुका, विविध सोहळे आदींना डोळे झाकून परवानगी दिली जाते, तमाशाबाबत मात्र दुजाभाव का केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करीत तमाशा मालक, कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तमाशाला आर्थिक उभारी देण्यासाठी शासनाने पूर्णवेळ ढोलकी तमाशा आणि हंगामी तमाशा फड मालक, कलावंताना अनुदान द्यावे, अशी मागणी तमाशा फड मालक अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर, मुसा इनामदार, रवी महाजन, एल. जी. शेख, तानाजी मुसळे, एस. के. पाटील यांनी केली.