ताम्हिणी घाटात आज सकाळी झालेल्या अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला असून तब्बल ५५ जण जखमी झाले आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. पुण्याकडून माणगावकडे येताना ट्रॅव्हल बस उलटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुण्याहून हरिहरेश्वरला पर्यटकांना घेऊन जात असताना या बसचा अपघात झाला. दरम्यान, अपघातामुळे काही काळ विस्कळीत झालेली या मार्गावरची वाहतूक आता सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमका कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ताम्हिणी घाटात सकाळी साडेसातच्या सुमारास एमएच ०४ एफके ६२९९ ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याहून माणगावच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बसचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला गेल्यानं पलटली.
अपघात झाल्यानंतर घाटातली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, बस रस्त्याच्या कडेला पलटल्यामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक लवकरच पूर्ववत झाली. अपघात झाल्यानंतर आसपासच्या काही वाहन चालकांनी अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने धाव घेतली. काही काळानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अपघातग्रस्तांना नजीकच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.