Tanaji Sawant angry on farmers in Dharashiv : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते तानाजी सावंत यांनी धाराशिवमधील शेतकऱ्यांना दम दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सावंतांवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “शेतकऱ्यांना त्यांची औकात दाखवण्याची भाषा करणे म्हणजे स्वतःची औकात दाखवण्यासारखं आहे”, असं मिटकरी म्हणाले. तसेच, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांना आता तरी त्यांची औकात दाखवणार आहेत का?” असा प्रश्न देखील मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. “मुख्यमंत्र्यांनी सावंतांवर कारवाई केली नाही तरी महाराष्ट्रातील शेतकरी सावंतांना त्यांची औकात दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असंही मिटकरी म्हणाले.

शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्याची औकात काढली. धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातील, वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात ही घटना घडली आहे. “सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत”, असं म्हणत सावंत यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला. डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. तेव्हा काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर सावंत यांनी संताप व्यक्त केला.

हे ही वाचा >> Babanrao Shinde : शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांच्या आमदाराची निवडणुकीतून माघार? माढ्यात काय शिजतंय?

सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी : अमोल मिटकरी

तानाजी सावंतांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राज्याच्या मंत्रिपदावर असलेल्या, एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांची “औकात काढणं म्हणजे शेतकऱ्यांसमोर स्वतःची औकात दाखवण्यासारखं आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की काल तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ज्या पद्धतीने तोंडसुख घेतलं, त्यानंतर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र अद्याप तुम्ही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेली नाही”.

हे ही वाचा >> Nitin Gadkari : “मागल्या जन्मी पाप करणारा या जन्मी साखर कारखाना काढतो किंवा…”, नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?

अमोल मिटकरी म्हणाले, “बैलपोळा सणाच्या तोंडावर बळीराजाला औकात दाखवण्याची भाषा करणाऱ्या तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री त्यांची औकात दाखवणार आहेत की नाही? मला असं वाटतं तानाजी सावंत यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्रतील शेतकरी पेटून उठेल आणि तानाजी सावंत यांना औकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही”.