शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाल्याचं म्हटलं. तसेच या सरकारसाठी आम्ही ४० आमदारांनी उठाव केला आणि भाजपाने त्याला चांगलं सहकार्य केलं, असंही नमूद केलं. मंगळवारी (६ सप्टेंबर) तानाजी सावंत यांच्या हस्ते सोलापूरमध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
तानाजी सावंत म्हणाले, “शिंदे गट, अमूक गट असं काही राहिलेलं नाही. शिवसेना आमचीच आहे. ही एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, आपल्या सर्वांची शिवसेना आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. त्यांनी हिंदुत्वाचा विचार सर्वांना दिला. तो विचार कोणीतरी सोडला होता, तोच विचार घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. हेच विचार घेऊन आम्ही सर्व जनतेची सेवा करू.”
“आम्ही ४० लोकांनी उठाव केला आणि भाजपाने…”
“सरकार येऊन ६० दिवस झालेत आणि मंत्रीमंडळ तयार होऊन १५ दिवस होत आले आहेत. तुम्हाला आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या मनातील हुंकार दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी ताकदीने निर्णय घेतला, आम्ही ४० लोकांनी उठाव केला आणि त्याला ३० वर्षे साथ असलेल्या भाजपाने चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे महाराष्ट्राला न भूतो न भविष्यते यश पाहायला मिळालं,” असं सावंत यांनी सांगितलं.
“२०२४ मध्ये ठाकरे गटाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”
“आता मागील अडीच वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढून २०२४ मध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जनतेच्या आशीर्वादीच गरज आहे. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपा, शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात यश मिळवू,” असंही त्यांनी नमूद केलं.
“…त्यावेळी खऱ्या अर्थाने ‘इनकमिंग’ पाहायला मिळेल”
तानाजी सावंत म्हणाले, “महानगरपालिकेचे ढोल अजून वाजायचे आहेत. १७ सप्टेंबरला मराठा क्रांती मुक्तीसंग्राम आहे. त्यानंतर एक पूर्ण दिवस मी सोलापूरमध्ये असेन. त्यावेळी खऱ्या अर्थाने ‘इनकमिंग’ पाहायला मिळेल. महानगरपालिकेचं बिगुल जेव्हा वाजेल तेव्हा वाजेल, पण सध्या आम्ही मागील अडीच वर्षात जो तोटा झालाय तो भरून काढायचा आहे.”
हेही वाचा : शिवसेनेचा आणखी एक नेता शिंदे गटात? गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
“ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र पाच वर्षे मागे गेला”
“या काळात महाराष्ट्र पाच वर्षे मागे गेला होता, प्रगती खुंटली होती. २०२४ पर्यंत महाराष्ट्र परत पुढच्या पाच वर्षांसाठी आघाडीवर नेऊन ठेवायचा हे ध्येय आम्ही बाळगलं आहे. त्यासाठी प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे,” असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.