लोकसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अशात भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यातही जागांवरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला होता. याला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राणा जगजितसिंह पाटील काय म्हणाले होते?
“२०२४ साली धाराशिवमध्ये भाजपाचा खासदार व्हावा. आपल्या हक्काचं मोदी सरकार २०२४ मध्ये पुन्हा यावं. या अनुषंगाने सहकार्य करावे,” अशी विनंती राणा जगजितसिंह पाटील यांनी केली होती.
हेही वाचा : सुधीर मुनगंटीवार आणि गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका, अजित पवार म्हणाले…
याबद्दल तानाजी सावंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तानाजी सावंतांनी सांगितलं की, “ही जागा शिवसेनेची आहे. चुकून त्यांच्यांकडून व्यक्तव्य करण्यात आलं असावे. कारण, शिवसेना आणि भाजपाची युती आहे. लोकसभेला आम्ही २३ ठिकाणी लढलो असून, १८ जागा निवडून आल्या. आम्ही आमच्या २३ जागांवर ठाम आहोत. निवडून आलेली किंवा पराभव झालेली एकही जागा शिवसेना सोडणार नाही.”
हेही वाचा : “देशात शरद पवारांची विश्वासार्हता राहिली नाही”, विजय शिवतारेंची सडकून टीका; म्हणाले, “अशा प्रवृत्तींना…”
“धाराशिवची जागा ही शिवसेनाच लढणार आहे. कार्यकारिणी उमेदवार ठरवेल. भाजपाकडून का दावा करण्यात आला माहिती नाही. ही जागा पारंपरिक पद्धतीने शिवसेनाच २५ वर्षापासून लढत आली आहे. त्यामुळे २०२४ सालीही ही जागा शिवसेनेचा लढवेल,” अशा शब्दांत तानाजी सावंत यांनी भाजपाला ठणकावून सांगितलं आहे.