सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा-पारगाव येथे दुधाचा टँकर उलटून झालेल्या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला, तर दोन सहप्रवासी गंभीर जखमी झाले.प्रवीण राजाराम शिंगटे (रा. गोटखिंड, ता. वाळवा) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री हा अपघात झाला. एका खासगी दूध कंपनीचा टँकर सांगलीहून पुण्याला जात होता. रात्री पारगाव खंडाळ्यातील काळभैरवनाथ मंदिर परिसरात टँकर अचानक उलटला. या वेळी चालकासह दोन प्रवासी टँकरमध्ये प्रवास करत होते. टँकर उलटताच रस्त्याकडेला असणाऱ्या कठड्यावर जाऊन आदळला. चालक प्रवीण राजाराम शिंगटे हा जागीच मृत झाला. सोबत प्रवास करणारे विकास अशोक फाळके (रा. सातारा) हे गंभीर जखमी झाले. अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. टँकरमधील दूध मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेले.

अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, शिरवळ रेस्क्यू टीम व ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमीला तत्काळ रुग्णालयात हलवले, तर चालकाचा मृतदेह उपस्थितांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. या वेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. जी. पवार, अंमलदार दत्ता दिघे, प्रकाश फरांदे, सचिन शिंदे उपस्थित होते.

या अपघाताबाबत मनोज आरगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. जी. पवार करीत आहेत.