अहिल्यानगरःनद्यांच्या खोऱ्यांचे विभाजन करणाऱ्या पठार भागात पाण्याचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते. पठार भागातील गावे सतत टंचाईग्रस्त असतात. उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच या गावांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु करण्याची वेळ येते. लोकसहभागातून यावर मात करण्यासाठी आणि गाव पाणीदार बनवण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेने स्थानिक पातळीवर ‘सेनापती बापट जलाग्रह अभियान’ सुरू केले आहे.
स्वातंत्र्यसेनानी, सेनापती बापट मूळचे पारनेरचे. त्यामुळे त्यांच्याच तालुक्यातून, त्यांच्याच नावाने प्रथम हे अभियान सुरु करण्यात आले आहे. पारनेरमधील कान्हूर परिसरातील १७ ते १८ गावे अशीच गोदावरी-कृष्णा खोऱ्याच्या विभाजकावर, पठारावर वसली आहेत. यापूर्वी तेथे मंजूर केलेली प्रादेशिक योजना वर्षानुवर्षे अपूर्णावस्थेत पडलेली आहे. उद्भव दरवर्षी डिसेंबरपासूनच कोरडे पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागते.
अहिल्यानगर जिल्ह्यात असे विभाजक गोदावरी व कृष्णा खोऱ्यात व उपनद्या असलेल्या सीना-भिमा खोऱ्यातील अहिल्यानगर संगमनेर, श्रीगोंदे, पाथर्डी भागात आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून विविध योजनांचे एकत्रीकरण करत सेनापती बापट जलाग्रह अभियान तयार करण्यात आले आहे. या अभियानात गावांच्या सहभागासाठी नियमावली क्षमता बांधणी, लोकसहभाग मिळवणे यासह प्रायोजक व शासकीय निधीतून १ कोटी रूपयापर्यंतचा विकासनिधी उपलब्ध करण्याची हमी देण्यात आली आहे.
अभियानाची सुरुवात पारनेरमधील करंदी गावातून झाली आहे. ग्रामसभेने त्याला मान्यता दिली. ते पाहून काकणेवाडी, पिंपळगाव रोठा आदी गावे पुढे आली आहेत. या गावांना पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी उपाययोजनांचा अराखडा तयार करुन देण्यात आला आहे. त्यात पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या खोलीकरणासह विभाजकाच्या खडकाची धारण क्षमता वाढवण्यासाठी स्फोट घडून आणण्यासारख्या अनेक उपायांचा समावेश आहे. यासाठी ग्रामपंचायतीने केवळ १८ ते ६० वर्षापर्यंतच्या प्रत्येक नागरिकांकडून फक्त ५ रुपयांचा लोकसहभाग द्यायचा आहे, तोही स्वतःच्याच खात्यात ठेव म्हणून ठेवायचा आहे. या अभियानातून पठार भागातील गावे पाण्यासाठी स्वयंपूर्ण करून टँकरमुक्त करण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न आहेत.
विहिरीतील पाण्याचा ताळेबंद
आमचे करंदी गाव पठार भागात, उंचावर असल्याने दरवर्षी जानेवारीपासूनच पाण्याची गैरसोय सुरू होते. गावात ३५० हून अधिक विहिरी आहेत. त्याची नोंद करून ताळेबंद ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी खोदलेल्या सर्व कुपनलिका बुजून टाकण्यात आल्या आहेत. त्याऐवजी अराखड्यातील नवीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. अभियानातील स्पर्धेत गाव बक्षीस मिळवेल असे प्रयत्न सुरू आहेत. -भास्कर गव्हाने, सरपंच, करंदी, पारनेर.
साठवण क्षमता वाढवण्याचे प्रयत्न
पठार भागातील खडकांमध्ये पाण्याची साठवण क्षमता कमी असते. विविध उपाययोजनांद्वारे ही क्षमता वाढवणाऱ्या सेनापती बापट जलाग्रह अभियानात पठार भागातील अधिकाधिक गावांनी सहभाग नोंदवून, पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी व टँकरमुक्तीसाठी सहभागी व्हावे.
-अजिंक्य काटकर, सहायक भू वैज्ञानिक, जिल्हा परिषद.
यंत्रणेमार्फत प्रबोधन
अभियानात लोकांच्या इच्छाशक्तीला महत्त्व आहे. त्यादृष्टीने यंत्रणेमार्फत प्रबोधन केले जात आहे. जेथे पाऊस पडतो तेथेच तो बंदिस्त करून त्याचा वापर काटकसरीने करण्याच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. भूगर्भातील पाणी पातळी वाढली तरी पीक पद्धतीत बदल करावा लागणार आहे. -आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.