अहिल्यानगर:जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम पाणीप्रकल्पामधून पर्याप्त पाणीसाठा असला तरी लाभक्षेत्रात टंचाईच्या झळया सुरू झाल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढू लागली तशी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. सध्या जिल्ह्यातील पाच गावातील १० हजार ९४६ लोकवस्तीला ४ टँकरच्या २१ खेपा करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात एकूण ३४८ टँकरमार्फत सुमारे ६.५ लाख रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. दरवर्षी उन्हाच्या झळया वाढू लागल्या की जिल्ह्याच्या काही भागात टँकर सुरू करावे लागतात. धरणात पर्याप्त पाणीसाठा असला तरीही टँकर सुरू करण्याची वेळ येते. यंदाही तीच परिस्थिती ओढवली आहे.
त्यानुसार संगमनेर तालुक्यातील सायखिंडी, पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, दरेवाडी व वरवंडी या पाच गावात १० हजार ९४६ रहिवाशांना चार टँकरच्या २१ खेपा सुरू करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु झाला आहे. जिल्हा प्रशासनाने यंदा आगामी नऊ महिन्याच्या कालावधीसाठी सुमारे ४१ कोटी रुपये खर्चाचा संभाव्य टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यानुसार जिल्ह्यात ६४३ गावे व २४१५ वाड्यावस्त्यांना संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते. गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने ८४ कोटी रुपये खर्चाचा आराखडा टंचाई निवारण आराखडा तयार केला होता. मात्र प्रत्यक्षात २९ कोटी रुपये खर्च झाला. यापूर्वी सन २०१८ मध्ये जिल्ह्याला टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या १ हजारावर पोचली होती.
धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे यंदा टँकर सुरू करण्याची वेळ उशिरा आली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच टँकर सुरू करावे लागले होते. गेल्या वर्षी मे २०२४ अखेरीस ३४८ टँकरच्या माध्यमातून सुमारे ६.५ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यावेळी ३२३ गावे व १७०८ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा केला जात होता.
जिल्ह्यात भंडारदरा, मुळा व निळवंडे असे तीन मोठी धरणे आहेत तर आढळा, मांडओहळ, पारगाव घाटशीळ, सीना, खैरी, विसापूर अशी सहा मध्यम प्रकल्प आहेत. त्यातील सध्याचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे (कंसातील आकडा गेल्यावर्षीचा)- भंडारदरा 79 टक्के (४८ टक्के), मुळा ५० (६२.६६), निळवंडे ४०.८८ (३३.३४), आढळा ६९.४३ (६९.४३), मांडओहळ ३०.३३ (१४.२४), पारगाव घाटशीळ १९.९२ (०.०६) सीना ५४.७९ (३०.३८), खैरी ५०.६५ (१९.०२) व विसापूर ५२.५३ टक्के ( ३५.९३ टक्के).