कल्पेश भोईर

भ्रष्टाचार रोखण्यासाठी महापालिकेचा निर्णय; १५ जूनपासून कार्यवाही

पालिकेच्या नळजोडणी प्रक्रियेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही प्रक्रियाच ऑनलाइन करण्याचा निर्णय वसई-विरार पालिकेने घेतला आहे. येत्या १५ जूनपासून कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे.

वसई विरार शहरात सूर्या टप्पा तीनचे शंभर दशलक्ष लिटर्स अतिरिक्त पाणी शहरात आल्यानंतर पाणीटंचाईची समस्या सुटली होती. मात्र नळजोडण्या देण्यावरून शहरात मोठा गदारोळ उडाला आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांनी नळ जोडण्या मिळवण्यासाठी अर्ज केले होते, परंतु त्यांना नळ जोडण्या मिळत नव्हत्या. नळजोडण्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी यामुळेच पाणीपुरवठा विभागातील अनेक अभियंत्यांना निलंबित देखील केले होते. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीकडून नळजोडणीत भेदभाव केला जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत होता. मागेल त्याला नळजोडणी मिळेल, असे पालिकेने सांगितले असले तरी अनेक दलाल तयार झाले होते. त्यामुळेच नळ जोडण्यांच्या कामात पारदर्शकता आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरार शहरात आले होते. त्यांनी देखील नळजोडणीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला होता आणि सर्व नळजोडण्या ऑनलाईन करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पालिकेने यापुढे नळ जोडण्या ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर येत्या १५ जूनपासून नळजोडण्या ऑनलाइन केल्या जाणार आहेत. नळजोडणी प्रक्रिया ऑनलाइन झाल्यास अर्जदार नागरिकांना प्रतीक्षा यादी कळणार आहे. ज्यांनी आधी अर्ज केला त्यांना नळजोडणी मिळणार आहे. किती अर्ज आले, किती प्रलंबित आहे, याची माहिती नागरिकांना मिळेल.

सर्वाना पाणी

वसई विरार शहराला दररोज २३० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो त्यात सूर्या धरणातून २०० दशलक्ष, पेल्हारमधून १० दशलक्ष तर उसगाव धरणातून २० दशलक्ष अशा स्वरूपात केला जात आहे. तसेच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अमृत योजनेअंतर्गत १३६ कोटी ररुपये खर्च करून तीनशे किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू  करण्यात आले असून शहरात ज्या भागात पाणी नाही अशा भागात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. सर्वाना पाणी मिळायला हवं ही पालिकेची भूमिका असल्याचे महापौर रुपेश जाधव यांनी सांगितले. नळजोडणीसाठी कुणाला एक रुपया देऊ  नये, असे त्यांनी आवाहन नागरिकांना केल्याचेही त्यांनी सांगितले.

अनधिकृत इमारतींनाही नळजोडण्या

वसई विरार शहरामध्ये हजारो अनधिकृत इमारती आणि चाळी आहेत. त्यांना पाणी देण्याच्या मुद्दयावरून मतभेद होते. मात्र पालिकेने शहरातील सर्व नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आणि महासभेत ठराव संमत केला. त्यामुळे आता शहरातील सर्व अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना नळ जोडण्या मिळणार आहेत.

वसई विरार शहरात नळजोडणीच्या प्रRियेत नागरिकांची फसवणूक होऊ  नये यासाठी नळजोडणीची प्रRिया ऑनलाइन करण्यात येणार असून येत्या १५ जूनपासून पालिकेच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात येईल.

-बी. जी. पवार, आयुक्त- वसई विरार पालिका.