|| नीरज राऊत

आणखी काही वर्षे स्वस्त वीज निर्मितीचा मुख्य स्रोत

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

वीजनिर्मिती क्षेत्रात देशात अणुऊर्जेचा स्रोत खुला करणारा ‘तारापूर अणुऊर्जा प्रकल्प’ पन्नाशीत येऊन ठेपला असला तरी आजही कार्यक्षमतेने सुरू असून आणखी काही वर्षे तो किफायतशीर वीजनिर्मिती आणि वितरणाचा मुख्य स्रोत ठरणार आहे. २८ ऑक्टोबर १९६९ या दिवशी या केंद्रातून व्यावसायिक तत्त्वावर वीजउत्पादन सुरू झाले. त्यामुळे पुढील वर्षी २८ ऑक्टोबरला हा प्रकल्प पन्नाशीत प्रवेश करीत आहे.

स्वातंत्र्यानंतर अवघ्या सात महिन्यात म्हणजे २३ मार्च १९४८ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत अणुऊर्जा विधेयक मांडले आणि ते संमत झाले. त्यायोगे अणुऊर्जा संशोधन आणि प्रकल्प उभारणीचे सर्वाधिकार केंद्र सरकारकडे एकवटले. त्यांच्याच कारकिर्दीत या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचा करार झाला. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या कारकिर्दीत त्याची उभारणी सुरू झाली आणि इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत  १९६९ मध्ये या केंद्रातून व्यावसायिक तत्त्वावर वीजउत्पादन सुरू झाले आणि एप्रिल १९७०मध्ये तो पूर्ण क्षमतेने ४२० मेगावॉट विजेचे उत्पादन करू लागला. १९७४पासून या प्रकल्पाचे तांत्रिक साह्य़ परदेशी कंपन्यांनी थांबवल्यानंतर देशातील शास्त्रज्ञांनीच या प्रकल्पाची आणि त्यासाठीच्या संशोधनाची धुरा समर्थपणे वाहिली. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि शास्त्रज्ञांची जिद्द या दोन्हींचा अनोखा संगम अधोरेखित करणारा ठरला आहे.

मे १९६४ मध्ये अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक कंपनीबरोबर ‘तारापूर अ‍ॅटॉमिक पॉवर स्टेशन’ अर्थात ‘टॅप्स’ उभारणीबाबत करारनामा झाला. त्यानंतर ऑक्टोबर १९६४ मध्ये या केंद्राची उभारणी सुरू झाली. त्या काळी दळणवळणाची साधने मर्यादित असल्याने बैलगाडीतून या प्रकल्पातील अनेक उपकरणे प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्यात आली होती! एप्रिल १९७० मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन करू लागला. युरेनियम २३५ या अधिक शुद्ध प्रतीच्या युरेनियमच्या माध्यमातून बॉयलिंग वॉटर रिअ‍ॅक्टर (बीडब्ल्यूआर) या पद्धतीच्या दोन अणुभट्टय़ा हे या प्रकल्पाचे वैशिष्टय़ होते. सोविएत युनियनव्यतिरिक्त आशिया खंडातील अशा अणुभट्टय़ा केवळ तारापूर येथेच होत्या.

१९७४ साली या प्रकल्पाला परदेशी कंपन्यांकडून मिळणारे तांत्रिक साहाय्य बंद झाले. त्यानंतर देशातील शास्त्रज्ञ आणि स्वदेशी कंपन्यांच्या मदतीने या प्रकल्पाची वाटचाल सुरूच राहिली. भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) यांच्याकडून इंधन व्यवस्थापन आणि विकसन, सुटे भाग उत्पादित करण्यास मार्गदर्शन, तसेच तांत्रिक मार्गदर्शन आदी जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या गेल्या. त्यामुळे देशातील या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाची भरभराट होत राहिली. या केंद्राद्वारे ८०-९५ पैसे प्रति युनिट इतक्या कमी दराने वीज उत्पादन होत असून महाराष्ट्र आणि गुजरातला वीजपुरवठा केला जातो.

वीज उत्पादन व्यवस्थेतील दुय्यम बाष्पजनित्रामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रारंभी २१० मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पाची क्षमता १६० मेगावॉटपर्यंत कमी करण्यात आली. समृद्ध युरेनियम पुरवठय़ावर जागतिक पातळीवर र्निबध आल्यानंतर देशातील शास्त्रज्ञांनी मिश्र ऑक्साइड इंधन विकसित करून त्याद्वारे या अणुभट्टय़ांतील वीजनिर्मिती सुरूच ठेवली.

इंधन पुरवठय़ाविषयीचा १९६०चा करारनामा आणि त्यावेळचे भट्टीबांधणी तंत्र पाहता हा प्रकल्प २५ वर्षे म्हणजे १९९४पर्यंतच कार्यरत राहू शकेल, असा प्रारंभिक अंदाज होता. त्यामुळे १९९३मध्ये या प्रकल्पाचा सुरक्षेच्या अंगाने तसेच ऊर्जानिर्मितीच्या दृष्टीने सखोल तांत्रिक आढावा घेण्यात आला. त्या आढाव्यानुसार १९९५मघ्ये या दोन्ही अणुभट्टय़ांचे आवश्यक ते नूतनीकरण, दुरुस्ती आणि पर्यायी बदल करून त्या अधिक सक्षम केल्या गेल्या. त्यामुळे त्यांचा कार्यकाळही आपसूक वाढला. तसेच आणखी काही वर्षे या अणुभट्टय़ा सक्षमतेने कार्यरत राहतील, असेही आढाव्यातून स्पष्ट झाले आहे.

भारतीय अणुऊर्जा महामंडळ आणि अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून या अणुभट्टय़ांची नियमित तपासणी केली जाते. त्या तपासणीनुसार वाढीव कालमर्यादा निश्चित केली जाते. या अणुभट्टीमध्ये पाचशेहून अधिक सुधारणा आणि अनेक सूक्ष्म अभियांत्रिकी बदल करण्यात आले असून या प्रकल्पाची कार्यक्षमता वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबरीने अणुकेंद्रामध्ये वीज उत्पादन ठप्प झाल्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव बॅक-अपसाठी डिझेल जनरेटर बसवण्यात आले असून फुकुशिमा त्सुनामीच्या प्रकारानंतर या डिझेल जनरेटरना विशिष्ट उंचीवर स्थलांतरित करण्यात आले आहे. फेब्रुवारी २००६मध्ये या प्रकल्पाचे कमाल नूतनीकरण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीनेही तो निर्धोक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१९६० च्या दशकात जगभरात उभारलेल्या इतर अणुभट्टय़ांपैकी पूर्ण सक्षमतेने कार्यरत असलेला तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा जगातला एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प देशांत सर्वात स्वस्त वीजपुरवठा करणारा ऊर्जा प्रकल्पही ठरला आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव प्रकल्प व्यवस्थापनाने कोणताही तपशील देण्यास नकार दिला. या केंद्राचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी योजना आखण्यात येत असून योग्य वेळी माध्यमांना माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

देशातील वीजनिर्मितीत अणुभट्टय़ांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा  प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पाने देशातील शास्त्रज्ञांच्या जडणघडणीत आणि संशोधनात मोठा हातभार लावला. त्यांना अधिक अनुभवसमृद्ध केले. या अणुभट्टीची प्रकृती आजही उत्तम असून त्यात आवश्यक सुधारणाही झाल्या आहेत. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमात या प्रकल्पाची वाटचाल ही देशाची यशोगाथा आहे.  – डॉ. अनिल काकोडकर