सावंतवाडी: संपूर्ण दोडामार्ग तालुका व सावंतवाडीतील एकूण १२ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार अवैधरित्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेनुसार टास्क फोर्स समितीमध्ये महसूल विभाग, वन विभाग व पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम असून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे हे आहेत. या समितीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील, दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली मंडल, सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा वानरे, आंबोली वनपरिक्षेत्र अधिकारी अमित कटके, सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, दोडामार्ग पोलिस निरीक्षक यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या समितीमार्फत प्राप्त तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जाणार आहे. दोडामार्ग तालुक्यात कुठेही गावात खासगी मालकी किंवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होताना निदर्शनास आल्यास या घटनेबाबत जनतेने गावातील पोलिस पाटील, वनरक्षक, तलाठी यांपैकी कोणालाही तातडीने कळवावे, जेणेकरून वनविभागाकडील अधिकारी वा कर्मचारी घटनास्थळी जावून तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करतील. तसेच अशा चौकशी प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचा-यांना क्षेत्रीय स्तरावर नागरीकांनी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा : सोलापुरात मुस्लीम समाज आघाडी विरोधात आक्रमक, उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचे संकेत
वृक्षतोडीबाबत ऑनलाईन तक्रारीसाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीचा ईमेल आयडी तयार करण्यात आला आहे. sdtfsawantwadi@ gmail.com या ईमेलवर वृक्षतोडीच्या घटनांबाबत तक्रार दाखल करता येणार आहे. तसेच वृक्षतोडीबाबत तक्रारीसाठी सावंतवाडी वनविभागाकडे दूरध्वनीद्वारेही तक्रार नोंदवता येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.