‘टाटा एअरबस प्रकल्प’ गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. टाटा एअरबससह आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याच चर्चेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी तसेच योग्य तोडगा काढण्यासाठी शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.
हेही वाचा >>>> ‘वेदांता फायरफॉक्स’, ‘टाटा-एअरबस’नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?
“मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. तूतू-मैंमैं करण्यापेक्षा राज्यात जास्तीत जास्त प्रकल्प कसे येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. चार ते पाच प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले आहेत. याचं दु:ख नसलं तरी महाराष्ट्रातून हे प्रकल्प का गेले याचा अभ्यास व्हायला हवा. महाराष्ट्र सर्व बाबतीत सरस असूनही हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
हेही वाचा >>>> एसआरए घोटाळा: “…तर मी स्वत: गाळ्यांना टाळं लावते,” पेडणेकरांच्या विधानावर सोमय्या म्हणाले “त्यांना तर दादासाहेब फाळके पुरस्कार…”
टाटा एअरबस प्रकल्पासह सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पदेखील महाविकास आघाडी सरकारमुळेच राज्याबाहेर गेलेला आहे, असा आरोप शिंदे गट- भाजपाकडून केला जातोय. यावरदेखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पुढच्या वेळी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल, असा लॉलीपॉप दिला जातोय. मी तर म्हणते सगळेच प्रकल्प राज्यात यायला हवेत. मी कोणावरही थेट आरोप करत नाही. विद्यमान सरकारमधील मंत्री महाविकास आघाडी सरकारमध्येही होते. तेव्हा ते झोपलेले होते का? महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना हे लोक सर्व कार्यक्रमात, फोटोंमध्ये दिसत होते. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असलेले आरोप हास्यास्पद आहेत,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.