लोकसत्ता प्रतिनिधी
रत्नागिरी : स्वस्ति मायक्रो फायनान्स कंपनीच्या टाटा पंच कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. हा अपघात रत्नागिरी शहराजवळील कारवांचीवाडी येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या कारवांचीवाडी जवळ हा अपघात झाला. स्वस्ति फायनान्स या मायक्रो फायनान्स कंपनीच्या टाटा पंच गाडीची (क्रमांक एमएच ०४ एल एच १६७८) समोरून येणाऱ्या एसटी बसशी समोरासमोर टक्कर झाली. या गाडीतून कंपनीचे पाच कर्मचारी प्रवास करत होते. हे सर्व कर्मचारी बुधवारी मध्यरात्री १२ वाजता मुंबईतील चेंबूर मधून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी सकाळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विकास नौसरे (वय ३४, रा. मुंबई) याला अपघातानंतर तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने मृत्यू झाला. तो स्वस्ति फायनान्स कंपनीत युनिट मॅनेजर या पदावर कार्यरत होता. कारवांचीवाडी येथील रस्त्यावर असलेले डायव्हर्जन गाडीचालकाच्या लक्षात न आल्याने या गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली असल्याचे सांगितले जात आहे. याविषयी रत्नागिरी ग्रामिण पोलीस अधिक तपास करीत आहेत.