गेल्या वर्षी २६ नोव्हेंबररोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानादरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर सर्वच स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, याप्रकरणी टाटा सन्सनेही प्रतिक्रिया दिली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत निवेदन जारी करत हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे.
हेही वाचा – महिलेच्या अंगावर लघुशंका प्रकरण : DGCA ने एअर इंडियाला फैलावर घेतलं; म्हणाले, “हा प्रकार…”
काय म्हणाले एन. चंद्रशेखरन?
पीडित महिलेने याप्रकरणी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहीत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर एन. चंद्रशेखरन यांनी निवेदन जारी करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “एअर इंडियाच्या विमानात घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी होती. मात्र, ही परिस्थिती हाताळण्यात आम्ही कमी पडलो. टाटा समूह आणि एअर इंडिया प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहेत. या घटनेचा तपास सुरू असून यापुढे अशा घटना घडणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्न करू”, असे ते म्हणाले. तत्पूर्वी, एअर इंडियाचे मुख्यकार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले होते.
आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
दरम्यान, या घटनेतील आरोपी शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी शनिवारी बंगळुरूमधून अटक केली होती. तसेच त्याला दिल्ली सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा – एअर इंडियाच्या विमानात लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातंय? वडिलांनी केला खळबळजनक दावा!
नेमकं प्रकरणं काय आहे?
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा याने बिझनेस क्लासमधील एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकारानंतर पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार करू नये म्हणून आरोपीनं त्यांची लेखी माफी मागितली. पोलिसांत तक्रार केल्यास त्याचा पत्नी आणि मुलांवर वाईट परिणाम होईल, अशी याचना आरोपीने केली होती. यानंतर पीडित महिलेनं आरोपीला माफ करून पोलिसांत तक्रार करणं टाळलं होतं. मात्र अलीकडेच एअर इंडिया कंपनीने आरोपी शंकर मिश्रा याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच मिश्रा याच्यावर ३० दिवस विमानातून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे.