ठाणे जिल्ह्य़ातील मध्य वैतरणा लेंडी आणि सूर्या प्रकल्पावरून विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि उपसभापतींच्या शाब्दिक जुगलबंदीने सभागृहात खसखस पिकली.
विनोद तावडे यांनी लक्षवेधी मांडली तेव्हा विरोधी बाकावरील इतर सदस्य आधीच्या एका लक्षवेधीवरून शासनाचा निषेध आणि सभात्याग करीत होते. मात्र, त्यानंतर उपसभापती वसंतराव डावखरे यांनी तावडे यांच्या लक्षवेधीचा पुकारा केल्याने तावडेंनी सभात्याग न करता ते जागेवरच थांबले. त्यामुळे खिजवण्याच्या स्वरात उपसभापतींनी सभात्याग केलेल्या विनोद तावडे यांच्या इतर सदस्यांची आठवण करून दिली. त्यावर विनोद तावडे यांनी लक्षवेधी उपसभापतींच्या मतदारसंघातील असल्याने लक्षवेधीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी मी थांबलो, असे उत्तर दिले. लक्षवेधी माझ्या नावावर खपवली तरी तावडेंच्या तावडीत मी सापडणार नाही असे सभापती म्हणताच तुमचे डावही खरे होणार नाहीत, असे प्रत्युत्तर तावडे यांनी देताच सभागृहात खसखस पिकली.
संबंधित लक्षवेधी ठाणे जिल्ह्य़ातील मध्य वैतरणा लेंडी, सूर्या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे नियमानुसार पुनर्वसन न झाल्याबद्दल विनोद तावडे यांनी उपस्थित केली होती. यावर पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण म्हणाले, लेंडी लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे जव्हार तालुक्यातील हिरडपाडा ग्रामपंचायतीतील भोतडपाडा या गावातील एकूण ६३ कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी ८४.६६ लाख रुपये दिले असून एकूण १८ नागरी सुविधांसह त्यांचे पुनर्वसन करणार असल्याचे सांगितले. लेंडी प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेनंतर प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सुर्या प्रकल्पामुळे बाधित १० गावातील एकूण १०२७ गावातील एकूण १०२७ घरे व १४५८ कुटुंबे विस्थापित झाली आहेत. त्यापैकी ३६७ कुटुंबांचे वनई चंद्रनगर तालुका डहाणू येथे व १५१ कुटुंबांचे शिगाव हनुमाननगर पालघर येथे पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती चव्हाण यांनी सभागृहाला दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा