भारतीय रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे महामंडळ यांचा समन्वय साधून कोकण रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्यास कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुदास तायलअयशस्वी ठरले आहेत. तायल कोकणी जनतेवर अन्याय करत असल्याने त्यावर आमचा रोष असल्याचे खासदार डॉ. नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत राणे यांनी तायल यांच्यावर रोखठोक टीकास्त्र सोडले. खासदार राणे म्हणाले की, कोकण रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलनही उभारले, पण कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तायल कोकणी जनतेवर अन्याय करत आहेत, ते काम करण्यास लायक नाहीत. रेल्वेचे प्रश्नासाठी ते पाठपुरावा करूनही साथ देत नाहीत. कोकण रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, पण तायल काही करत नाहीत. त्यांची येथून हकालपट्टी केली जावी, अशी माझी भावना आहे. भारतीय रेल्वे व कोकण रेल्वे महामंडळ यांच्यात समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच मडुरा येथे टर्मिनस व्हावे म्हणून पाठपुरावा सुरू असून, मडुरा येथेच टर्मिनस होईल, असे त्यांनी सांगितले. गाडगीळ अहवाल, मुंबई-गोवा चौपदरी महामार्ग आदींसाठी पाठपुरावा सुरू आहे, तसेच सागरी महामार्गाचा मुंबईचा सीआरझेड रिलॅक्सेशन मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत, असे राणे म्हणाले. आमदार केसरकर यांनी केलेल्या टीकेबाबत राणे म्हणाले की, आमदारांच्या टीकेला तथ्य नाही. संसदेतील कामाची माहिती लोकांसाठी खुली आहे. वेबसाइटवर पाहण्यास मिळेल. सुमारे ३५० प्रश्न मांडले ते आमदारांनी प्रथम पाहून नंतर बोलावे.    

Story img Loader