धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. धारावीकरांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाने आज मोर्चाचे आयोजन केले आहे. तसंच, आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि अदानींवर घणाघात केला. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर प्रकल्प असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. त्यांच्या या टीकेवर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा”, अशी काव्यात्मक टीका आशिष शेलार यांनी केली. “हा हसवणूक आणि फसवणुकीचा धंदा आहे. ५०० फुटांची घरे हवी होती मग उद्धव मुख्यमंत्री होतात तेव्हा टेंडरमध्ये अट घालायची होती. तेव्हा का नाही घातली? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाठा. त्यामुळे त्यांच्या पोटदुखीचा हा कार्यक्रम आहे”, असा पलटवार आशिष शेलारांनी केला.

हेही वाचा >> “धारावीत देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा”, संजय राऊतांचा घणाघात; म्हणाले, “गुजरात लॉबी…”

धारावीतून निघाणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला थांबवण्याकरता दिल्लीतून दबाव आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. त्यावर आशिष शेलार म्हणाले की, तुमच्यावर कोणाचा दबाव होता मग? तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का? पवारांनी दिल्लीतून फोन केला होता का?

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला दिल्याने धारावीत ड्रग्स तस्करी वाढेल, धारावीतील मुलं ड्रग्सचं पाकिटं विकतील, अशी भीती संजय राऊतांनी आज व्यक्त केली. त्यावर आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊत रोज गांजा आणि चिलीम मोडूनच पत्रकार परिषदेला बसतात. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात सातत्य आणि सत्यता नसते.

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा आहे, असाही गंभीर आरोप संजय राऊतांनी आज केला. हा देशातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यावर आशिष शेलार म्हणाले, या टेंडरच्या अटी, कार्यपद्धतीचे आणि त्याबाबतीतले धोरणात्मक निर्णय उद्धव ठाकरेंच्याच काळात झाले आहेत. टेंडरमध्ये गडबड असेल, टीडीआर घोटाळा असेल तर सर्वस्वी पाप उद्धवजींचं आहे.