लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : ‘अब की बार, चारसौ पार’चा नारा देण्यामागे भाजपला देशातील लोकशाही आणि संविधान नष्ट करून हुकूमशाही आणून सामान्य जनतेची पिळवणूक करायची आहे. ‘मूँह में राम बगल में छुरी’ हीच भाजपची प्रवृत्ती आहे. लोकशाही आणि राज्य संविधानाचे रक्षण करण्यासाठी भाजपला धडा शिकवा, अशी हाक सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.
अक्कलकोट तालुक्यातील प्रचार दौऱ्यात दुसऱ्या दिवशी चपळगाव, नन्हेगाव, पितापूर व अन्य गावांतून आमदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. रणरणत्या उन्हात झालेल्या या दौऱ्यात पोहोचल्यानंतर तेथे एखाद्या पारावर कापडी मंडपाखाली किंवा समाज मंदिरात संवाद होत असताना त्यात महिलांचा लक्षणीय प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. महिलांमध्ये घोळक्यात शिरून त्यांच्याशी हितगूज करीत मने जिंकण्यावर आमदार प्रणिती शिंदे यांचा भर पाहावयाला मिळाला.
आणखी वाचा-जगदंबेच्या मंदिरात सप्तरंगाची उधळण, भक्तीमय वातावरणात तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी
ग्रामस्थांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधताना आमदार प्रणिती शिंदे स्थानिक विकासाचे प्रश्न मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांकडून कसे दुर्लक्षित आहेत, हे थेट ग्रामस्थांच्या मुखातूनच जाणून घेताना भाजपच्या विरोधात खदखद उजेडात आणण्याचा प्रयत्न करतात. दुष्काळाचे संकट संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघावर ओढूनही त्यातील सर्व सहापैकी एकही तालुक्याला दुष्काळी मदत मिळाली नाही, या मुद्यावर बोट ठेवून आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडतात.