गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने आंदोलन, मोर्चा, उपोषण करीत जि. प. शिक्षण विभागाकडे न्यायाची मागणी करणाऱ्या १२८ वसतिशाळा शिक्षकांच्या नियुक्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नियुक्त्यांच्या मागणीसाठी ७ वसतिशाळा शिक्षकांनी २६ जानेवारीला सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता.
जिल्हय़ात एकूण ३४७ वसतिशाळा शिक्षक होते. गेल्या ३ वर्षांपासून हे शिक्षक कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. जि. प. शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रश्नावर सातत्याने टोलवाटोलवी करीत होते. कायम नियुक्तीच्या मागणीसाठी वसतिशाळा शिक्षकांनी वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसले. प्रशासनाला मात्र याचा ना खेद ना खंत अशी स्थिती होती. याच मागणीसाठी वसतिशाळा शिक्षकांनी २६ जानेवारीला जि. प.समोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून वसतिशाळा शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. काही दिवसांनी या प्रश्नाला राजकीय स्वरूप आले. यात हस्तक्षेप करून तत्काळ नियुक्त्या द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा विरोधकांनी दिला होता. अखेर वसतिशाळा शिक्षकांपकी २१९ जणांना जानेवारीअखेर निमशिक्षक म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या. उर्वरित १२८ जणांना नियुक्त्या देण्यासंदर्भात प्रशासनाकडून दिरंगाई होत होती. या १२८ निमशिक्षकांनीही वारंवार आंदोलने, निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर १ मार्चला या शिक्षकांना निमशिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली. गेवराई, माजलगाव, शिरुर, केज, पाटोदा, धारुर, परळी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात या वसतिशाळा शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

Story img Loader