संगमनेर : संगमनेर शहरा लगत असलेल्या मालदाड येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षकाकडून महिला शिक्षिकेला मारहाण होण्याचा अजब प्रकार घडला. विशेष म्हणजे ज्यांची भांडणे शिक्षकांनी सोडविणे अपेक्षित असते, अशा विद्यार्थ्यांनीच या शिक्षकांचे भांडण सोडविण्याचा उफराटा प्रकार बघाव्यास मिळाला. या घटनेची तालुक्यात मोठी चर्चा असून संबंधित शिक्षकेने त्या शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मालदाड गावातील माध्यमिक विद्यालयात नियुक्तीस असलेल्या महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी शाळेतील शिक्षक दत्तू किसन कौटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शिक्षिकेच्या पतीचा वाढदिवस असल्याने गुरुवारी तिने पतीला देण्यासाठी शाळेमध्ये पुष्पगुच्छ आणला होता. या पुष्पगुच्छाच्या कारणावरून शाळेतील शिक्षक कौटे यांनी शिक्षिकेला टोमणे मारले होते. यासंदर्भात संबंधित शिक्षकाने शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती.

यानंतर काल, शुक्रवारी सकाळी संबंधित शिक्षकाने सदर शिक्षकाची भेट घेऊन आपला यामागे कोणताही वाईट उद्देश नव्हता असे सांगितले. महिला शिक्षिकेने मला तुमच्याशी बोलायचे नाही असे सांगितल्याने दोघांमध्ये वादावादी झाली. या दरम्यान शिक्षकाने या महिला शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर मारहाण करण्यास सुरुवात केली असल्याचे संबंधित फिर्यादी महिलेने म्हटले आहे. दरम्यान शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच अचानक घडलेला हा प्रकार पाहून विद्यार्थी भांबावले. विद्यार्थ्यांनीच या भांडणात मध्यस्थी करत दोन्ही शिक्षकांना बाजूला केल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर संबंधित महिला शिक्षिकेने घुलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षका विरोधात तक्रार दिली. संगमनेर तालुका पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

दरम्यान या विचित्र घटनेनंतर तेथील विद्यार्थी, पालक आणि तालुक्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्यांनी विद्यार्थी घडवायचे, विद्यार्थ्यांवर सुयोग्य संस्कार करायचे, मुलांमध्ये वाद झाला तर ते सामंजस्याने मिटवायचे त्यांनीच असा प्रकार करावा हे खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत. मालदाड येथील माध्यमिक विद्यालय नावाजलेले आहे. तेथे हा प्रकार घडल्याने गावकरीही संतप्त झाले. प्रेमाचा संदेश देणाऱ्या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शिक्षकांच्यात मारहाण व्हावी, त्यातही पुरुष शिक्षकाने महिला शिक्षिकेवर हात उचलावा यासारखे दुर्दैव नाही अशा प्रतिक्रिया तरुण वर्गातून उमटल्या.