“कसल्याही प्रकारची चोरी नाही, भ्रष्टाचार केला नाही. कधी कोणाचे वाईट केले नाही. चुकून बोललो असेल, तर तेही न्यायिकपणे बोललो, तरीही माझ्याविरुद्ध षडयंत्र का?”, असा प्रश्‍न उपस्थित करत सहकारी प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (६ एप्रिल) बीडमध्ये घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत एका प्राध्यापकासह त्याच्या सहकार्‍यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहे.

बीड शहरातील पालवण चौक भागातील राहत्या घरात शिक्षक राहुल ईश्‍वर वाघमारे (वय ५०) यांनी गळफास घेतला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन राहुल वाघमारे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. वाघमारे यांनी तीन वेगवेगळ्या चिठ्या लिहून ठेवल्या आहेत. त्यामध्ये त्रास देणार्‍या दोघांचा उल्लेख करण्यात आला.

राहुल वाघमारे हे शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलिसांना कळविली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिक्षकाच्या घरामध्ये सुसाईड नोट आढळून आली. यामध्ये त्यांनी त्रास देणार्‍या प्राध्यापक बाळासाहेब लाखे व मुन्ना या दोघांचा उल्लेख केला आहे.

वाघमारे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे की, सर्व जनतेस पोलीस, डॉक्टर, समाज बांधव, मीडिया, सरकार शासन यांना जाहीरपणे सांगतो की, मी कसल्याही प्रकारची चोरी किंवा भ्रष्टाचार केलेला नाही. हा सर्व प्राध्यापक बाळासाहेब लाखे यांचा कट आहे. अशा बाबींचा उल्लेख या चिठ्ठीमध्ये करण्यात आला आहे. अन्य मजकूरही चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलेला आहे. ही चिठ्ठी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा : याचिका मागे घेण्यासाठी १२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी, संस्था चालक, बीडमध्ये मुख्याध्यापकासह चौघांवर गुन्हा दाखल

दरम्यान, वाघमारे यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चिट्ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.  

Story img Loader