रत्नागिरी – शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मानसिक छळ होत असल्याची लेखी निवेदनाने तक्रार संगमेश्वर तालुक्यातील एका शिक्षिकेने जिल्हा परिषदेकडे केली आहे. या प्रकारानंतर शिक्षक संघटनांनी या शिक्षिकेला पाठिंबा देत संबंधित अधिका-यावर कारवाईची मागणी केली आहे.
वरिष्ठ अधिका-या कडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार संगमेश्वर तालुक्यातील शिक्षिकेने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे तक्रार सादर केली आहे. तक्रार निवेदनात म्हटले आहे की, संबंधित वरिष्ठ अधिकारी विनाकारण मानसिक त्रास देत आहेत. शिक्षिकेची शाळा ही दुर्गम भागात असून, तिथे मोबाइलला रेंजची नसते. तरीही, अधिकाऱ्याकडून जाणीवपूर्वक माहिती मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच शाळेला विविध योजनांपासून वंचित ठेवण्यासाठी ग्रामस्थांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात असून, शाळा व्यवस्थापन समितीला पत्र देण्यात आल्याचेही शिक्षिकेने म्हटले आहे.
येथील शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग असून, दोन शिक्षक मंजूर आहेत. मात्र, यापैकी एका शिक्षकाची कामगिरी काढून टाकण्यात आली आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्याची कार्यालयात भेट घेतली असता, त्यांनी आपल्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे की, “माझं कोणत्याही शिक्षकांशी पटत नाही, मी वाद करत राहते,” असे सांगून अधिकाऱ्याने आपली बदनामी केल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. या प्रकारामुळे शाळेतील शिक्षण व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
दोन महिन्यांपूर्वी शिक्षण विभागातील एका विस्तार अधिकाऱ्याने शिक्षिकेबरोबर गैरवर्तन केल्याची घटना देखील घडली होती. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली होती. तसेच अधिकाऱ्याला निलंबित करून त्याच्यावर विभागीय चौकशी लावण्यात आली होती. आता पुन्हा एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार आल्याने शिक्षण विभागातील कारभार चव्हाट्यावर आला आहे.
या प्रकरणामुळे संगमेश्वर तालुक्यातील काही शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. शिक्षक संघटनांनी या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर टीका करत, शिक्षकांना मानसिक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी, असे पत्र प्रशासनाला दिले आहे.