‘कुंभारासारखा गुरू नाही रे जगात, वर घालतो धपाटा आत आधाराचा हात’ या विचाराने प्रेरीत होऊन गुरू-शिष्य परंपरेला उजाळा देणारा आगळा उपक्रम शहरात राबविण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त एकत्र आलेल्या गुरू-शिष्यांनी नात्यातला स्नेह जपताना या वेळी जुन्या आठवणी जागविल्या.
औरंगपुरा येथील शिशुविहार शाळेतील १९८८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी प्रथमच पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. पुण्या-मुंबईसह इतरत्र विखुरल्या गेलेल्या व सध्या निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या शिक्षकांचा या वेळी सन्मान करण्यात आला. संस्कारक्षम शिक्षणाची महती नव्या पिढीला व्हावी, या हेतूने राबविलेला हा उपक्रम अनुकरणीय असल्याची भावना श्रीमती सीमा कुलकर्णी यांनी या वेळी व्यक्त केली. बदलत्या काळात शिक्षणाचा दर्जा खालावत चालल्याची भीती व्यक्त होते. या पाश्र्वभूमीवर या उपक्रमातून आजच्या विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षणाची महती पटू शकेल, असे श्रीमती अनुराधा फडके यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’ च्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘यशस्वी भव’ उपक्रमातील लघुपुस्तिकांचे वाटप शिशुविहार विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांना करण्यात आले, असे मुख्याध्यापक उषा नाईक यांनी या वेळी नमूद केले. ‘साद शाळेची बंध मैत्रीचे’ शीर्षकाखाली या स्नेहमेळ्याचे आयोजन केले होते. उज्ज्वला ताम्हणे-चपळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. विजया भाले यांनी आभार मानले. मराठवाडय़ासह इतर ठिकाणांहून निवृत्त शिक्षक, जुने विद्यार्थी उपस्थित होते.
गुरू-शिष्य परंपरेला स्नेहमेळ्यातून उजाळा
गुरुपौर्णिमेनिमित्त एकत्र आलेल्या गुरू-शिष्यांनी नात्यातला स्नेह जपताना या वेळी जुन्या आठवणी जागविल्या. औरंगपुरा येथील शिशुविहार शाळेतील १९८८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.

First published on: 15-07-2014 at 01:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher student get together