गणितातील प्रश्नांची भाषा सोपी कशी करायची? शैक्षणिक सहली कशा असाव्या? लहान मुलांसाठीचे सिनेमे कोणते? अमुकअमुक विषयातल्या ‘टीचिंग एड’ कुठे मिळतील? यासारख्या शिक्षणाशी संबंधित असंख्य लहानसहान गोष्टींवर ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या किंवा सोशल मीडियाच्या इतर माध्यमांतून चर्चा करणारे शिक्षकांचे गट महाराष्ट्रात झपाटय़ाने वाढत आहेत. पण, आता या गटांच्या माध्यमातून उपक्रमशील शिक्षकांना एकत्र आणून त्यांच्या मदतीने इतरही शिक्षकांना शैक्षणिकदृष्टय़ा समृध्द करण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू झाला आहे. म्हणून ‘सोशल मीडिया फॉर एज्युकेशनल कॉज’ असे उद्दिष्ट ठेवत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षकांचे गट तयार करण्याला उत्तेजन देण्यासाठी खुद्द शालेय शिक्षण विभागाचे सचिवच पुढे सरसावले आहेत.
या गटांच्या माध्यमातून ई-लर्निगला चालना मिळेल, असा एक विचार यामागे आहे. स्वत: शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यापैकी काही समुहांच्या माध्यमातून शिक्षकांशी थेट व नियमितपणे संवाद साधत असतात हे विशेष. राज्यात सध्याच्या घडीला असे सुमारे २७ व्हॉट्सअ‍ॅप गट कार्यरत आहेत.
अशा चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न पहिल्यांदा ‘अ‍ॅक्टिव्ह टिचर्स फोरम’ (एटीएफ) या शिक्षकांच्या गटात सुरू झाला. शिक्षकांचे विश्व समृध्द करण्याच्या दृष्टीने आम्हाला या गटाचा मोठा उपयोग झाला, असे या गटाचे प्रमुख (अ‍ॅडमिन) भाऊसाहेब चासकर यांनी सांगितले.