शिक्षकदिन कार्यक्रमात शिक्षकाने सुनावलेले खडे बोल ऐकून घेण्याची तसदीही न दाखवता प्रशासनाकडून या शिक्षकाची झालेली मुस्कटदाबी एका बाजूला आणि दुसरीकडे मंत्री-आमदारांनीच केलेला आपापल्या पक्षाचा प्रचार, हे जि. प. शिक्षकदिन कार्यक्रमाचे वैशिष्टय़ ठरले. शहरातील संत तुकाराम नाटय़गृहात तब्बल ३ वर्षांनी ६२ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उशिरा पुरस्कार मिळाल्याने शिक्षकांनी व्यक्त केलेली नाराजी पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार व आमदार विक्रम काळे यांना मात्र चांगलीच खटकली.
जि. प.चे लोकप्रतिनिधी केवळ रस्ते-बंधाऱ्यांच्या चर्चा सभागृहात करतात. शिक्षण व्यवस्थेकडे कोणाचे लक्षच नाही. तीन-तीन वर्षे पुरस्कार दिले जात नाहीत. एमएस सीआयटी पूर्ण केली नाही, म्हणून वेतनवाढी बंद केल्या जातात. शिक्षकांना सुविधा मिळतच नाही. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासही कोणी पुढाकार घेत नाही, असे खडे बोल शिक्षक सेनेचे पदाधिकारी प्रभाकर पवार यांनी कार्यक्रमात सुनावले. त्यामुळे मंत्री सत्तार व शिक्षक आमदार काळे पुरते गांगरले. या शिक्षक पदाधिकाऱ्याला पुढे बोलू न देण्यास अधिकाऱ्यांना फर्मावण्यात आले आणि शेवटी त्यालाही भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यानंतर मंत्री, आमदारांनी हा कार्यक्रम राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेच भाषणात सांगितल्याने जि. प. शिक्षकदिनाचा कार्यक्रम भलत्याच वळणावर गेला.
शिक्षक सेनेचे पवार यांचे भाषण धारदार झाले. जि. प.चे लोकप्रतिनिधी शिक्षण विभागाकडे कसे दुर्लक्ष करतात, हे त्यांनी सांगितले. कोल्हापुरी बंधाऱ्यावर व रस्त्याच्या कामांवर चर्चा होते. मात्र, शिक्षकांच्या प्रश्नी कोणीच लक्ष देत नाही. राज्यात कोठेही एमएस सीआयटी पूर्ण केले नाही, म्हणून शिक्षकांच्या वेतनवाढी बंद केलेल्या नाहीत. शिक्षक पुरस्काराचेही राजकारण केले जाते. गुणवत्तेकडे कोणाचेच लक्ष नाही. शेजारच्या जालना जिल्ह्य़ात दीड हजारहून अधिक शाळांचा रंगही एकसारखा आहे. गुणवत्ता विकास वाढीसाठी तेथील सीईओंनी विशेष अभियान राबविले. ते आपल्या जिल्ह्य़ात का राबविले जात नाही, असा सवाल पवार यांनी केला. तो व्यासपीठावरील सर्वानाच झोंबला. शिक्षकदिन कार्यक्रमात असे बोलायचे नाही, असे सुनावण्यात आले. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या शिक्षकाला खाली बसवले.
नंतर भाषणाला उभे राहिलेले मंत्री सत्तार यांनी शिक्षकच राजकारण करतात. त्यांच्यामुळेच आपण एकदा निवडणुकीत पराभूत झालो होतो. सरकार चांगले नाही असे ते सांगत सुटले तर आमची अडचण होईल. त्यामुळे तुम्ही असे काही करू नका, असे सांगत शिक्षक संघटनांचीच गरजच नसल्याचे वक्तव्य केले. पोलिसांमध्ये संघटना बांधता येत नाही, तशी शिक्षकांमध्ये संघटना असूच नये, असेही ते म्हणाले. केवळ एवढेच नाही, तर ३ वर्षांनी एकदा पुरस्कार दिला आहे. आम्हाला निवडणुकीला ५ वर्षे असतात. त्यात मूल्यमापन करता येते. तसे शिक्षकांचेही मूल्यमापन दर निवडणुकीच्या निमित्ताने केले जावे व मगच पुरस्कार दिला जावा, असेही सत्तार हसत-हसत म्हणाले.
आमच्याकडे लक्ष ठेवा, असे सांगताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची आठवण आमदार काळे यांनी करून दिली. आता आदर्श पुरस्कार मिळाला. आता आदर्श वागणेही अपेक्षित आहे. शाळेत वेळेवर पोचावे लागेल. त्यासाठी ‘हातावरच्या घडय़ाळा’कडे लक्ष ठेवा. शाळांचा दर्जा घसरत चालला. त्यामुळे परीक्षा सुरू करायला हवी, अशी शिफारस केंद्राकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा बंद केल्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असेही ते म्हणाले. जि. प. अध्यक्षा शारदा जारवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदींची उपस्थिती होती.

Story img Loader