सांगली : मुलांच्या पाठीवर पुस्तकाचे ओझे नको म्हणून दप्तराविना शाळा ही संकल्पना काही शाळांनी अंमलात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, तासगाव तालुक्यात बस्तवडेतील शाळेने शिक्षकाविना शाळा हा उपक्रम राबविल्याचा प्रकार शनिवारी घडला. मुख्याध्यापक महिलेच्या मुलीचा साखर पुडा असल्याने शाळेतील सर्वच शिक्षकांनी दांडी मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

बस्तवडे येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची ६४ पट असणारी प्राथमिक शाळा आहे. शनिवारी शाळेची वेळ सकाळी साडेसात ते दहा अशी होती. मात्र, शाळेची कुलुपे बोगस शिक्षिकेने काढल्यानंतर मुले वर्गात आली, शाळेत बसली मात्र, शिक्षकांचा पत्ताच नव्हता. शाळेत महिला मुख्याध्यापकासह दोन शिक्षक कार्यरत आहेत. शनिवारी मुख्याध्यापिकेच्या मुलीचा कोल्हापूर येथे साखरपुडा होता. यासाठी सहशिक्षिका आणि त्या स्वत: कोल्हापूरला रवाना झाल्या होत्या. तर सहशिक्षक जाण्याच्या तयारीत शाळेकडे फिरकलेच नाहीत. यामुळे शाळेतील विद्यार्थी व्हरांड्यात खेळतच होते. ही माहिती शालेय शिक्षण समितीला समजताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. ही बाब कोल्हापूरला साखर पुड्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षकांला समजातच त्यांने शाळेत येण्याचे कष्ट घेतले. मात्र, तोपर्यंत शाळा सुटण्याची वेळ झाली होती. महत्वाचे म्हणजे यापैकी एकाही शिक्षकांनी अधिकृत रजा घेतलेली नव्हती.

या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर कृती अहवाल सादर करण्यात येईल- शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers in the school have taken leave because the principal daughter has a sugarbox in sangli amy