राज्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबतचे निर्बंध शासनाने उठवले आहेत, अशी माहिती येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी दिली. सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय धर्मे या वेळी उपस्थित होते.
डॉ. राजमाने म्हणाले, की ऑक्टोबर २०११ मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेंतर्गत आढळून आलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीवर शासनाने र्निबध घातले होते. तथापि, राज्यात शिक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर २ मे २०१२च्या आदेशान्वये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर शासनाने घातलेले र्निबध २० जून २०१४ च्या शासन निर्णयाद्वारे उठवण्यात आले आहेत.
या आदेशान्वये शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदे भरता येणार आहेत. तथापि, आयुक्त शिक्षण यांनी संगणक प्रणाली निश्चित केलेल्या संचमान्यतेनुसार शाळानिहाय रिक्त पदांची निश्चिती होईल. त्यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरत असले तरी तालुक्यामध्ये किंवा जिल्हय़ामध्ये किंवा विभागीय स्तरावर त्यांचे समायोजन करावे असे शासन आदेशान्वये नमूद करण्यात आले आहे. तथापि काही पदे रिक्त राहात असतील तर अशी पदे शासनाच्या पूर्वपरवानगीने भरावीत असे शासन आदेशामध्ये म्हटले असल्याचे डॉ. राजमाने यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा