शिक्षकांना समाजात मानाचे स्थान आहे. शिक्षक हा छंदाचाही पेशा आहे, त्यामुळे शिक्षकांनी व्यापक दृष्टीकोन ठेवून व चिकित्सक पद्धतीने विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात केले. शिक्षकांच्या पुरस्कार निवडीत यंदा कोणतेही वाद झाले नाहीत, याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले.
चौदा प्राथमिक शिक्षक व दोन केंद्रप्रमुख अशा सोळाजणांना शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष मंजुषा गुंड होत्या. जि. प. शाळांमधील गुणवत्ता उंचावत असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी शिक्षकांचे कौतुक केले.
माहिती अधिकार कायद्याची जेवढी प्रभावी अंमलबजावणी होते, तेवढी शिक्षण हक्क कायद्याची होत नाही, अशी खंत व्यक्त करुन विखे म्हणाले, देश महासत्ता होताना मनुष्यबळ संशोधनात आवश्यक तेवढी गुंतवणूक होताना दिसत नाही. शिक्षणाचे व्यावसायिकीकरण झाले मात्र मुल्यवर्धीत व गुणवंत शिक्षणात पाहिजे तेवढा बदल झालेला नाही. शिक्षकांनी सामाजिक दायीत्व म्हणुन खेडय़ातील मुले दत्तक घ्यावीत, कालबाह्य़ शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांनी आपल्या प्रयोगशीलतेमधून आत्मविश्वास निर्माण झालेले विद्यार्थी घडवावेत तसेच व्यवस्थेत बदल घडवणारा विद्यार्थी तयार करावा, ही क्षमता निश्चितच शिक्षकांमध्ये आहे.
श्रीमती गुंड यांनी शिक्षण विभागाकडील प्रश्नांकडे लक्ष वेधले तर, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी शाळा खोल्या व शाळेच्या संरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी केली. पुरस्कारार्थी शिक्षक संदीप वाकचौरे, बाळासाहेब साळुंके व नाना गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी अशोक कडुस यांनी प्रास्तविकात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सुरु असणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शैक्षणिक दिपस्तंभ पुस्तिकेचे प्रकाशन तसेच कार्यक्रमस्थळी शिक्षकांनी उभारलेल्या शैक्षणिक साहित्य व शिक्षकांच्या पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. सभापती शरद नवले, बाबासाहेब दिघे, नंदा वारे, मीरा चकोर, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी स्वागत केले. विस्तार अधिकारी शिवाजी कराड व निर्मला साठे यांनी सूत्रसंचलन केले.

Story img Loader