दक्षिण गडचिरोलीतील हिंसाचारात वाढ
सुरक्षा दले चिंताग्रस्त
स्वतंत्र तेलंगण आंदोलनाचा फायदा
गेल्या अनेक वर्षांपासून तेलंगणा राज्याच्या चळवळीत सक्रिय असलेली तरूणाई आता नैराश्यातून नक्षलवादी चळवळीला जवळ करू लागल्याने तब्बल १० वर्षांनंतर प्रथमच नक्षलवाद्यांना आंध्रमध्ये सक्रियतेसाठी संधी मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली असून दक्षिण गडचिरोली भागातील हिंसक कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
शेजारचे आंध्रप्रदेश हे राज्य एकेकाळी नक्षलवादी चळवळीचा गड म्हणून ओळखले जात होते. ही चळवळ संपुष्टात आणण्यासाठी आंध्रने १९९९ मध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेल्या पोलीस जवानांचे ग्रेहाऊंड हे पथक स्थापन केले. या पथकाने बजावलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर या राज्यात चळवळीचा पूर्णपणे सफाया झाला. ग्रेहाऊंडच्या स्थापनेनंतरच्या दहा वर्षांत या पथकाने सुमारे ९०० नक्षलवाद्यांना ठार केले. या धडक कारवाईमुळे कंबरडे मोडलेल्या या चळवळीतील बडय़ा नेत्यांनी नंतर छत्तीसगड व महाराष्ट्रात आश्रय घेतला. आंध्र सरकारने धडक कारवाईसोबतच विकास कामांवर सुद्धा भर दिला. त्यामुळे या राज्यातून या चळवळीला मनुष्यबळ मिळणे जवळजवळ बंद झाले होते. या पाश्र्वभूमीवर आता पुन्हा ही चळवळ आंध्रमध्ये पुन्हा डोके वर काढू लाल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे.
या चळवळीतील नेत्यांनी या सक्रियतेसाठी अतिशय हुशारी दाखवत सध्या सुरू असलेल्या स्वतंत्र तेलंगणा आंदोलनाचा फायदा घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र राज्यासाठी सुरू असलेले हे आंदोलन सध्या परमोच्च बिंदूवर आहे. नक्षलवाद्यांनी आरंभापासून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात सक्रीय असलेल्या तेलंगणा भागातील तरुणाईवर सध्या अनेक खटले प्रलंबित आहेत. आंदोलनात सहभागी झाले म्हणून तरुणाईला अनेकदा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले आहे. यातून या तरूणाईच्या मनात निर्माण झालेल्या व्यवस्था विरोधी असंतोषाचा फायदा नक्षलवाद्यांनी घेणे सुरू केले आहे असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्वतंत्र राज्याचा निर्णय होत नसल्याने आंदोलनात सहभागी झालेल्या प्रामुख्याने तरूणांमध्ये नैराश्य पसरले आहे. अशा तरूणांना हेरून त्यांना चळवळीत दाखल करून प्रशिक्षण देण्याचा उद्योग नक्षलवाद्यांनी सुरू केला आहे. दोन आठवडय़ापूर्वी अशा तरूणांना गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यातील जंगलात प्रशिक्षण दिले जात असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले होते.
गेल्या ३० वर्षांपासून मध्य भारतात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांचा नेहमीच फुटिरतावादी आंदोलनाला पाठिंबा राहिला आहे. तेलंगणाच्या चळवळीकडे सुद्धा नक्षलवादी याच भूमिकेतून बघत आले आहे व आता त्यातून मनुष्यबळ मिळवण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आंध्रमध्ये ग्रेहाऊंडची स्थापना झाल्यानंतर नक्षलवाद्यांना सपशेल माघार घ्यावी लागली होती. २००४ मध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्या काही समर्थकांच्या मदतीने चळवळीला जनता साथ का देत नाही या विषयावर एक सर्वेक्षण केले. आंध्रच्या दुर्गम भागात प्रशासनाचे निर्माण झालेले अस्तित्व, शिक्षणाचा झालेला प्रसार व बळकट संपर्क यंत्रणेमुळे सामान्य जनता चळवळीपासून दूर गेली असा निष्कर्ष यातून समोर आला होता. तेव्हापासून आंध्रकडे कमी लक्ष देणाऱ्या नक्षलवाद्यांनी गेल्या दोन वर्षांत तेलंगणा आंदोलनाचा फायदा उचलत पुन्हा सक्रियतेच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. आंध्रमध्ये ही चळवळ संपल्यात जमा झाल्याने दक्षिण गडचिरोली भागात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया मंदावल्या होत्या. मात्र, त्यात पुन्हा वाढ झाल्याने महाराष्ट्रातील पोलिसांची चिंताही वाढली आहे.
तेलंगण समर्थक तरुणाई नक्षलवाद्यांच्या आश्रयास
गेल्या अनेक वर्षांपासून तेलंगणा राज्याच्या चळवळीत सक्रिय असलेली तरूणाई आता नैराश्यातून नक्षलवादी चळवळीला जवळ करू लागल्याने तब्बल १० वर्षांनंतर प्रथमच नक्षलवाद्यांना आंध्रमध्ये सक्रियतेसाठी संधी मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली असून दक्षिण गडचिरोली भागातील हिंसक कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
First published on: 05-01-2013 at 03:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana fearing youth under the shadow of naxalite