सोलापूर : तेलुगु भाषक विणकर पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवात समस्त पद्मशाली समाज लोटला असतानाच त्याचे औचित्य साधून तेलंगणाच्या दोन मंत्र्यांसह भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांनी या रथोत्सवात सहभाग घेतला. त्याची चर्चा सामाजिक व राजकीय वर्तुळात रंगली होती.
गेल्या आषाढी यात्रेच्यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपले संपूर्ण मंत्रिमंडळासह स्वतःच्या बीआरएस पक्षाचे आमदार, खासदार आणि नेत्यांचा लवाजामा पंढरपुरात आणला होता. त्यावेळी हैदराबादहून आलेल्या सहाशे वाहनांच्या ताफ्यातून बीआरएस पक्षाकडून झालेल्या शक्तिप्रदर्शनाची चर्चा संपूर्ण राज्यात झाली होती.
हेही वाचा >>> “आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक पर्याय, पण…”, उद्धव ठाकरेंचं विधान; म्हणाले, “बजरंगबली…”
या माध्यमातून राज्यात पक्षाच्या बांधणीला वेग आला असतानाच सोलापुरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या आणि स्थानिक राजकारणात प्रभावी असलेल्या तेलुगुभाषक पद्मशाली समाजाच्या मार्कंडेय ऋषी महामुनींच्या रथोत्सवात होणा-या पद्मशाली समाजाच्या मांदियाळीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पक्षाचे नेते व तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरीश राव, गृहमंत्री महमूद अली, महाराष्ट्राचे प्रभारी के. वंशीधर राव, आमदार एन. रमणा आदींनी सोलापुरात रथोत्सवात सहभाग घेतला. यावेळी अर्थमंत्री हरीश राव यांनी सोलापूरच्या मार्कंडेय ऋषी मंदिराच्या विकासाठी तेलंगणा सरकारकडून एक कोटी रूपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली. याचवेळी मिर्कंडेय ऋषींच्या रथोत्सवावर हेलिकाॕप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा संकल्प बीआरएस पक्षाने सोडला होता. परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाने तांत्रिक कारण पुढे करून त्यास परवानगी नाकारली. त्यामुळे हेलिकाॕप्टरमधून मार्कंडेय रथोत्सवावर पुष्पवृष्टी करण्याच्या संकल्पावर पाणी पडले. यापूर्वी, पंढरपुरातही आषाढी यात्रा सोहळ्यावर बीआरएसने हेलिकाॕप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा बेत आखला असता प्रशासनाने त्यास परवानगी नाकारली होती.
हेही वाचा >>> आमदार बाबर यांच्या व्याह्यांच्या घरातून ३ लाखाचा ऐवज लंपास
यंदाच्या मार्कंडेय रथोत्सवात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी सर्व पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला असला तरी त्यांच्यापेक्षा तेलंगणाच्या मंत्र्यांसह तेथील बीआरएस पक्षाच्या नेत्यांच्या सहभागाची चर्चा सार्वत्रिक स्वरूपात रंगली होती. या माध्यमातून बीआरएस पक्षाने राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.