सोलापूर शहर व परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना तापमानात गेल्या आठवडय़ापासून चढ-उतार होत आहे. काल सोमवारी ३५.६ अंश सेल्सियस इतके तापमान मोजले गेले होते. तर, मंगळवारी दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा पुन्हा वाढून तो ४१.५ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविण्यात आला. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक अक्षरश: कासावीस झाले आहेत.
दहा दिवसांपूर्वी शहराचे तापमान यंदाच्या उन्हाळ्यात उच्चांकी स्वरूपात म्हणजे ४३.६ अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते. त्यानंतर हवामानात बदल होऊन तापमानाचा पारा आठवडाभरात खाली आला व पुन्हा वाढत गेले. दोन दिवसांपूर्वी सोलापूरचे तापमान वाढत जाऊन ४३.४ अंश सेल्सियसपर्यंत  गेले होते. मात्र काल सोमवारी पुन्हा ३५.६ अंशापर्यंत तापमान खाली आले.त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा पुन्हा वाढल्याचे दिसून आले. तापमान कमी-जास्त होत असले तरी उष्म्यामुळे होणारी धग सर्वाना संत्रस्त करीत आहे.