जळगाव, मुंबईत सर्वाधिक कमाल तापमान

राजस्थान आणि कच्छच्या काही भागांतून नैर्ऋत्य मोसमी पावसाने २९ सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू केला आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता व्यक्त होत असतानाच तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक उकाडय़ाने हैराण झाले आहेत.

राज्यात जळगावपाठोपाठ मुंबईत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सध्या राज्याच्या तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी असली, तरी पुढील तीन ते चार दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात मुख्यत: कोरडय़ा हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राजस्थानचा काही परिसर, कच्छ आणि उत्तर अरबी समुद्रातून मोसमी पाऊस माघारी फिरल्याचे हवामान विभागाने २९ सप्टेंबरला जाहीर केले. उर्वरित राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आदी भागांतून मोसमी पाऊस एक ते दोन दिवसांत माघारी फिरेल. त्यानंतर पुढील दहा ते बारा दिवसांतून तो राज्यातून माघारी जाण्याचा अंदाज आहे. तत्पूर्वी राज्याच्या विविध भागांत दुपारनंतर पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी संध्याकाळी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सांगली, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही भागांत पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी पाऊस हजेरी लावत असला, तरी सकाळपासून चांगलेच ऊन जाणवत आहे. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागांत कमाल तापमानामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. रविवारी सर्वाधिक ३६.७ अंश सेल्सिअस तापमान जळगाव येथे नोंदविण्यात आले. त्यापाठोपाठ मुंबईत ३६.६ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे ३६.४ तापमान नोंदविले गेले. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान ३५ अंशाच्या पुढे आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी भागांमध्ये ३१ ते ३४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा जाणवत आहे.