मुंबई, कोकण वगळता इतरत्र तापमानात घट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील आठवडय़ात बहुतांश भागात ढगाळ स्थिती असल्याने गायब झालेली थंडी राज्यात पुन्हा अवतरत आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे वाहत असल्याने मुंबई आणि कोकण वगळता इतरत्र किमान तापमानात घट नोंदविली जात आहे. काही भागामध्ये सकाळी धुक्याची अनुभूतीही मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यातील वातावरण कोरडे राहणार असल्याने गारठा वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये रात्री आणि पहाटे गारवा जाणवत होता. मात्र, त्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मागील आठवडय़ात काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती. याच कालावधीत सर्वत्र ढगाळ स्थिती निर्माण झाल्याने थंडी गायब झाली होती. सध्या बहुतांश भागात निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान आहे.त्याचप्रमाणे उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत आहेत. त्यामुळे किमान तापमानात पुन्हा घट सुरू झाल्याने संध्याकाळपासूनच गारव्याचा अनुभव मिळतो आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान आणि कमाल दोन्ही तापमानात घट होताना दिसते आहे. मुंबई आणि कोकण विभागात मात्र किमान तापमान अद्यापही २१ ते २४ अंशांच्या आसपास असल्याने या भागात दमट वातावरण आहे.

नागपूर येथे रविवारी तापमानात सरासरीच्या तुलनेत २.४ अंशांची घट होत या ठिकाणी राज्यातील नीचांकी १२.० तापमान नोंदविले गेले. उच्चांकी कमाल तापमान रत्नागिरी येथे ३५.२ अंश इतके नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्रात पुणे येथे कमाल तापमान १४.९ अंश होते. महाबळेश्वर येथे १६ अंशांच्या आसपास तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक येथे नीचांकी १३.६ तापमान नोंदविले गेले. मराठवाडय़ात बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा १३ ते १६ अंशांवर आहे. विदर्भामध्ये नागपूरपाठोपाठ गोंदिया, ब्रह्मपुरी, अकोला या भागात गारठा वाढला आहे. या ठिकाणी १२ ते १६ अंशांच्या दरम्यान किमान तापमान आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature in maharashtra
Show comments