चंद्रपूर, अकोला, परभणीत तापमान ४७ हून अधिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या बहुतांश भागात आलेली तीव्र उष्णतेची लाट रविवारीही कायम राहिली. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर राहिल्याने नागरिकांची होरपळ झाली. रविवारी अकोला, परभणी आणि चंद्रपूर या तीन ठिकाणच्या तापमानाचा पारा तब्बल ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. या शहरांसह राज्यातील अनेक ठिकाणी रविवारी नागरिकांनी सर्वात उष्ण दिवस अनुभवला.

पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र बहुतांश भागातील तापमान कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे तीव्र उष्म्यापासून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. राज्यात एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली होती. कोरडे हवामान आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर दिवसा आणि रात्रीच्या तापमानाने एकदम उसळी घेतली. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आली आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाडय़ाने नागरिकांना हैराण केले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंशांनी वाढला आहे. किमान तापमानातही त्यात प्रमाणात वाढ झाली आहे. कोकण विभागातील तापमानही सरासरीच्या पुढे गेले आहे.

रविवारी विदर्भातील अकोला, चंद्रपूर आणि मराठवाडय़ातील परभणी येथे राज्यातील उच्चांकी ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंशांवर नोंदविला गेला. मराठवाडय़ात बीड येथे ४५.१ अंश, तर औरंगाबाद येथे ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात पुण्यातील तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५.१ अंशांनी वाढला असून, तो ४३ अंशांवर गेला. जळगाव, मालेगाव, सोलापूर आदी ठिकाणी ४३ ते ४४ अंशांवर तापमान आहे. कुलाबा ३४.५ अंश, तर सांताक्रुझमध्ये ३५.५ अंशांवर कमाल तापमान आहे. सरासरीच्या तुलनेत ते अधिक असल्याने उकाडय़ात वाढ झाली आहे.

राज्यात २९ एप्रिलला विदर्भामध्ये अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ३० एप्रिलला विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. १ मे नंतर तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature in maharashtra