चंद्रपूर ४७.९ नागपूर ४७.३, अमरावती ४७.२
शनिवारी नागपूर शहराचे राज्यातील सर्वोच्च तापमान ४७.० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्यावर रविवारी संपूर्ण विदर्भाच्या तापमानात भयंकर वाढ झाली आहे. तीन शहरांचे तापमान ४७ अंशाच्या वर पोहोचले आहे. यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर ४७.९, नागपूर ४७.३, अमरावती ४७.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
विदर्भात रोज तापमानाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण असतानाही तापमानात अधिकाधिक वाढ होत असल्याचे दिसत आहे. चंद्रपूर आणि अमरावतीचे तापमान गेल्या महिन्यापासून ४२.० ते ४५.० च्या दरम्यान सुरू असतांना रविवारी तापमानाची विक्रमी नोंद करण्यात आली. सूर्य प्रचंड आग ओकत असल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट, उष्ण हवा, उन्हाचे भयंकर चटके जाणवत आहेत. विदर्भातील काही गावात भारनियमन असल्यामुळे गावकऱ्यांना तीव्र उन्हाचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या उन्हाच्या चटक्याने थंड हवा देणारा कुलर भरदुपारीही काम करेनासा झाला आहे. दिवसा कडक उन्हाचे चटके आणि रात्री प्रचंड गरम हवा सहन करणे कठीण जात आहे.
रविवाराचे तापमान चंद्रपूर ४७.९, नागपूर ४७.३, अमरावती ४७.२, ब्रम्हपुरी ४६.७, अकोला ४५.१, गोंदिया ४५.१, वर्धा ४६.०, यवतमाळ ४४.२, वाशीम ४३.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येणाऱ्या दिवसात तापमानात वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.