वादळी वा-यासह अवकाळी पावसाची अधूनमधून होणारी हजेरी यामुळे यंदाच्या उन्हाळय़ात सोलापुरात तापमानाचा पारा कधी ४३ अंश सेल्सियसच्या घरात तर कधी ३६ अंशापर्यंत खाली येत असल्याचा अनुभव घेतला जात असताना मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानाचा पारा पुन्हा वाढत ४४ अंशाकडे सरकत चालल्यामुळे सोलापूरकर चांगलेच हैराण झाले आहेत.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी अचानकपणे अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे उष्म्यामुळे संत्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र सायंकाळनंतर पुन्हा उकाडा वाढल्याने अबालवृद्ध नागरिक पुन्हा बेजार झाले. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असून सकाळी नऊपासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. गेल्या १९ मे रोजी तापमानाचा पारा वाढून ४१.४ अंशापर्यंत गेला होता. परंतु दुस-या दिवशी अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा खाली येऊन ३७.३ अंशापर्यंत नोंदविला गेला. मात्र २१ मे रोजी तापमानाचा पारा पुन्हा वाढून तो ४२ अंशाच्या घरात गेला. २२ मे रोजी किंचित घट होऊन ४१.१ अंश तापमानाची नोंद झाली असताना २३ मे रोजी पुन्हा तापमानाचा पारा वाढत ४२.६ अंशापर्यंत गेला. त्यानंतर २४ मे रोजी ४३.४ तर २५ मे रोजी ४३.५ अंश सेल्सियसपर्यंत तापमानाचा पारा वाढत गेल्यामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले.
सोमवारी सकाळपासूनच उष्णतेची झळ सर्वाना बसू लागली. सकाळी नऊपासूनच उन्हाचे चटके बसू लागल्यामुळे नागरिकांनी उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून शक्यतो उन्हात रस्त्यावर फिरणे टाळले. दुपारी प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक थंडावली होती. त्यामुळे अघोषित संचारबंदीसारखी स्थिती पाहावयास मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, महानगरपालिका आदी ठिकाणी एरवी दिसणारी वर्दळ घटल्याचे दिसून आले. घरात विद्युत पंखेही काम करेनासे झाल्यामुळे गारव्यासाठी कुलर, वातानुकूलित यंत्रणेचा आधार महत्त्वाचा मानला जात आहे. तथापि, दिवसभर उकाडय़ाने सारेच हैराण झाले असताना दुपारनंतर आकाशात मेघगर्जना होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन सर्वाना किंचित दिलासा मिळाला. तसेच तापमानही ४१.६ वर खाली आले.

Story img Loader