अवकाळी पावसामुळे लांबलेल्या उन्हाळ्याचे चटके आता बसू लागले आहेत. मागील आठवडय़ात ३० ते ३२ अंशावर असलेले तापमान आता कमालीचे वाढले असून, सोमवारी परभणीचे तापमान ३९ अंश नोंदवले गेले.
दरवर्षी होळी सणापासून उन्हाळ्यास प्रारंभ होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून उन्हाच्या झळा बसू लागतात. यंदा मात्र ढगाळ वातावरण व मध्येच पडणारा अवकाळी पाऊस यामुळे उन्हाळा लांबला होता. मागील दोन आठवडे वातावरणात झालेला बदल, थंडगार वारे, तसेच काही ठिकाणी गारपीट यामुळे उन्हाची तीव्रता फारशी वाटली नाही. आता मात्र तापमानात वाढ होत चालली आहे. शनिवारी व रविवारी परभणीचे तापमान ३७ अंशांवर पोहोचले होते. सोमवारी त्यात दोन अंशांनी वाढ होऊन ३९ अंश नोंद वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या वेधशाळेत झाली. सोमवारी सकाळपासून कडाक्याचे ऊन पडले. दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. यामुळे उन्हाळ्याची जाणीव सर्वानाच झाली. दोन दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने दुपारच्या वेळी रस्त्यावरील रहदारीमध्ये घट झाली. जागोजागी उभारलेल्या रसवंती व शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढताना दिसत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारपेठेत टोप्या, रुमाल, गॉगल यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. शाळांच्याही वेळेत बदल करण्यात आला असून, दुपारी बारापर्यंतच शाळा सुरू ठेवण्यात येत आहेत. मार्चच्या अखेरीस वाढत चाललेले तापमान एप्रिलमध्ये आणखी तीव्र होईल, असा अंदाज विद्यापीठातील वेधशाळेने वर्तवला आहे.

Story img Loader