साऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा ‘नव तपा’ सुरू होण्यापूर्वीच विदर्भातील अकरापैकी पाच जिल्ह्य़ांचे तापमान ४७ अंश सेल्सियसच्या वर पोहोचल्याने येत्या २५ मे नंतर चंद्रपूर किंवा नागपुरात तापमानाचे आणखी नवे उच्चांक नोंदले जाण्याची शक्यता आहे. मे महिन्यात दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये तापमानाचे उच्चांक मोडीत निघाले असून कधी नव्हे ते अमरावती शहरातही बुधवारी ४८ अंशाची नोंद झाली. महाराष्ट्राच्या अन्य भागांच्या तुलनेत भरपूर वनाच्छादन लाभलेली चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती ही शहरे आता ‘हॉट सिटी’ त परावर्तित होऊ लागल्याने उन्हाळ्याचा मार्च, एप्रिल आणि मे असा तीन महिन्यांचा काळ काढणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
सलग तिसऱ्या दिवशी चंद्रपूर शहरात ४८.२ डिग्री तापमानाची नोंद घेण्यात आल्याने लोक अक्षरश: हादरले आहेत. नागपूर शहराचे तापमानही ४७.९ एवढय़ा विक्रमी आकडय़ापर्यंत पोहोचले आहे. एवढय़ा प्रचंड तापमानवाढीसाठी वीज प्रकल्पांचे वाढते जाळे, औद्योगिक प्रदूषण आणि जंगलतोड हे तीन घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरले असून ‘अॅडव्हांटेज विदर्भ’च्या पाश्र्वभूमीवर विदर्भातील औद्योगिक विस्तारावर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची चिन्हे आहेत. येत्या वर्षभरात वेस्टर्न कोलफिल्डच्या ३८ नव्या ओपन कास्ट कोळसा खाणी कार्यान्वित होणार असल्याने विदर्भातील खाणींची संख्या ९० च्या घरात पोहोचणार असून तापमानात किमान २ अंश सेल्सियसने वाढ होण्याची भीती वर्तविली जात आहे. शिवाय विदर्भात येऊ घातलेले नवे औष्णिक वीज प्रकल्प तापमानवाढीत आणखी भर टाकणार आहेत.
केंद्र सरकारने कोळशावर आधारित १३२ औष्णिक विद्युत प्रकल्पांसाठीचा मार्ग मोकळा केल्याने विदर्भात ८६ हजार ४६० मेगाव्ॉट वीज निर्मिती होण्याचे स्वप्न दाखविले असून अधिकृत आकडेवारीनुसार एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्य़ात सर्वाधिक ५८ वीज प्रकल्पांचा सुरू होतील. याची निर्मिती क्षमता २८ हजार मेगाव्ॉट राहील, असा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्य़ात २८ विद्युत प्रकल्प सुरू होणार असून त्यांची क्षमता १७ हजार मेगाव्ॉट राहणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात २२ हजार मेगाव्ॉट क्षमतेच्या १६ प्रकल्पांना परवानगी मिळाली असून प्रदूषणाचे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ातही १४ हजार मेगाव्ॉट ऊर्जा निर्मिती क्षमतेचे १६ तर गांधी जिल्हा वध्र्यातील सेवाग्राम परिसरात ३२०० मेगाव्ॉटचे तीन प्रकल्प येणार आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोलीत कोळसा व पाण्यावर आधारित तीन वीज प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. अकोल्यातील पारस, खापरखेडा, कोराडी विद्युत प्रकल्पांची वीज निर्मिती क्षमता ३ हजार मेगाव्ॉटपर्यंत वाढविली जाणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन आहेत.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गोंदिया, वर्धा, यवतमाळ शहरातील तापमानात यावर्षी अचानक प्रचंड वाढ झाली असून त्याचा आरोग्य व कृषी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे.
कोळसा खाणी, औष्णिक विद्युत प्रकल्प, कोळशावर आधारित उद्योग चंद्रपुरात सर्वाधिक प्रमाणात असल्याने यातून तयार होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडचा ऊत्सर्ग, घरगुती कोळसा ज्वलन, यामुळे जमिनीवर वायूचे एक आवरण तयार झाले आहे. सूर्याची उष्णता जमिनीवर येते. परंतु जमिनीवरच अडून राहत. त्यामुळे दिवसाचे आणि रात्रीचे तापमान वाढते. यालाच हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट म्हटले जाते.
नव तपा म्हणजे काय?
खगोल अभ्यासक डॉ. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यातील अंतिम नऊ दिवस अतिशय उष्ण राहतात, अशी धारणा असल्याने या नऊ दिवसांना ‘नव तपा’ असे म्हटले जाते. यंदाचा नव तपा २५ मे ते २ जून या कालावधीत राहणार आहे.