परभणी : गेल्या दोन दिवसांत तापमानात मोठी वाढ झाली असून, प्रचंड उष्णतेने जिल्ह्यातील जलसाठे आटू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत आकाश ढगाळ राहिल्याने तापमानही कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा उन्हाचा कडाका वाढला आहे. आज सोमवारी (दि.२१) येथे ४२.२ अंश सेल्सिअस असे कमाल तापमान नोंदवले गेले.

सकाळी दहा वाजताच उन्हाचा चटका वाढत असून, बाजारपेठेतही भर दुपारी शुकशुकाट जाणवत आहे. भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्याने विहिरी आटू लागल्या आहेत तर तलाव कोरडे पडू लागले आहेत. सर्व जलसाठे दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. येथील कृषी विद्यापीठातील हवामान विभागाच्या वतीने नोंदवले जाणारे तापमान आणि शहरातील हवामान विभागाच्या वतीने नोंदवले जाणारे तापमान यात मोठी तफावत आढळून येते.

रविवारी (दि.२०) कृषी विद्यापीठात नोंदवले गेलेले कमाल तापमान हे ४१.८ अंश सेल्सिअस एवढे होते तर शहरातल्या हवामान केंद्रातले तापमान हे ४२.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले होते. आज सोमवारीही तापमान वाढलेलेच असल्याने सर्वत्र उष्णतेचा अनुभव येत होता.

वाढत्या तापमानाचा परिणाम जिल्ह्यातल्या जलसाठ्यांवर होत आहे. जिल्ह्यात करपरा आणि मासोळी हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. मासोळी प्रकल्पामध्ये ३६ टक्के तर करपरा प्रकल्पात २३ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. पावसाळ्यासाठी अजून दीड महिन्याहून अधिक काळ शिल्लक असल्याने हे जलसाठे शेवटपर्यंत पुरतील काय, याची चिंता लागलेली आहे.

जिल्ह्यातले लघु तलाव मात्र कोरडे पडले आहेत. जिंतूर तालुक्यातील जोगवाडा, चारठाणा बेलखेडा, केहाळ, आडगाव, चिंचोली या सर्वच लघुतलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे तर मानवत तालुक्यातील आंबेगाव, जिंतूर तालुक्यातील देवगाव आणि परभणी तालुक्यातील पेडगाव या तलावातील जलसाठा जोत्याखाली गेला आहे. सोनपेठ तालुक्यातील नखातवाडी लघु प्रकल्पात ३ टक्के, पालम तालुक्यातील तांदुळवाडी लघु प्रकल्पात १२ टक्के तर गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव प्रकल्पात २५ एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.

जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला असून, कडब्याचे भाव वाढताना दिसून येत आहेत. वाढत्या तापमानाने उन्हाळी पिकांना झळा बसत असून, फळबागाही पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत. विशेषतः डोंगराळ भागात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात जाणवत आहे.