विरार पूर्वेच्या महामार्गालगत असलेल्या शिरसाड परिसरात टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी (१० मे) सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. वाहनचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने मोठी दुर्घटना टळली.
वाढत्या उष्णतेमुळे व वाहनातील तांत्रिक अडचणीमुळे वाहनांना आगी लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. मंगळवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या टेम्पोला शीरसाड येथे केटी रिसॉर्टसमोर भीषण आग लागली. चालकाने प्रसंगवधान राखत टेम्पो एका मोकळ्या जागेच्या ठिकाणी घेतला.
टेम्पोला लागलेल्या आगीनंतर वाहनांच्या चाकांनीही पेट घेतला. त्यामुळे आगीची तीव्रता वाढली होती. याची माहिती वाहतूक पोलीस व स्थानिक नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
हेही वाचा : शाहरुखच्या घराजवळील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना
या आगीत टेम्पो जळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.