डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात दिलेला लढा कदापिही विसरता येण्यासारखा नाही. अंधश्रध्दा आणि अनिष्ट चालीरितींना आपल्या जीवनातून कायमचे हद्दपार करण्यासाठी लढत राहणे, हीच डॉ. दाभोलकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर शोक व्यक्त केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची झालेली हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करुन त्यांच्या हत्येबाबत माहिती देणाऱ्यास राज्य शासनाच्या वतीने १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात, एक विचार संपविण्याचा झालेला हा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा असून, तो सहन केला जाणार नाही. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवून अनिष्ट चालीरिती बंद करणे, हा एक मोठा सामाजिक लढा आहे आणि या लढाईत आपण तेव्हाच जिंकू, जेव्हा या मोहिमेला कायद्याचे अधिष्ठान लाभेल, असे डॉ. दाभोलकरांनी अतिशय कणखरपणे वारंवार मांडले. जादूटोणा आणि अनिष्ट चालीरितीविरोधी कायद्याचा मसुदा तयार करण्यात त्यांनी जे परिश्रम घेतले, त्याबद्दल निश्चितच त्यांच्या विषयी कृतज्ञतेची भावना आहे आणि पुढेही राहील.
हा कायदा प्रत्यक्षात अंमलात यावा, म्हणून डॉ. दाभोलकर यांच्याशी माझी त्याचप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांशी अनेकदा चर्चा झाली. कायद्याची आवश्यकता आणि परिणामकारकता यावर ते अतिशय मुद्देसुद आणि अभ्यासपूर्वक विवेचन करीत. प्रत्येक चर्चेच्यावेळी या मसुद्यामध्ये वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणा होत होत्या. या कायद्याच्या अनुषंगाने समाजातील विविध पक्ष, संघटना, लोक यांच्याशी शासनाची सातत्याने चर्चा सुरु होती. ही सगळी प्रक्रिया सुरु असतानाच डॉ. दाभोलकर यांच्यासारखा या कायद्याचा प्रणेता अचानक आमच्यातून निघून गेला, हे अतिशय दु:खदायक आहे. डॉ. दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या मागे कोण आहेत त्यांचा पुरेपुर छडा लावण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
दाभोलकर हत्या: हल्लेखोरांची माहिती देणाऱयाला दहा लाखांचे बक्षिस
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात दिलेला लढा कदापिही विसरता येण्यासारखा नाही.
First published on: 20-08-2013 at 11:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten lacs cash reward for information about narendra dabholkar murder