जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. परंतु औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध केल्यास १० लाखांचा निधी ग्रामपंचायतीला देणार असल्याची जाहीर घोषणा खासदार राजीव सातव यांनी एका कार्यक्रमात केली होती. ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे हे ग्रामस्थ सातवांकडून १० लाखांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.
सातव यांचा नालेगाव येथे जूनमध्ये ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी गावातील सभामंडप बांधकामास १५ लाख निधी जाहीर केला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी जिल्हा प्रशासनाला निधी वितरीत करण्यासाठी पत्रही दिले. जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. गावचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचा वाद होता कामा नये, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गावातील विकासकामासाठी १० लाखांचा निधी देणार असल्याची घोषणा केली. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून सातवांनी जाहीर केलेला १० लाखांच्या बक्षिसाचे ग्रामस्थ मानकरी ठरले. नालेगाव ग्रामपंचायतीत ७ सदस्य निवडून द्यावयाचे होते. मनकर्णाबाई विभुते, बाबाराव राखोंडे, कुसुमताई आहेर, सखुबाई पांडववीर, कलाबाई राखुंडे, शंकरराव कदम, प्रभाकर विभुते या ७ उमेदवारांनीच नामनिर्देशनपत्र दाखल केले. मंगळवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. सातही अर्ज वैद्य ठरले. या उमेदवारांविरोधात इतर उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज न आल्याने हे सात उमेदवार निवडून आल्याची घोषणा ६ ऑगस्टला होणे बाकी आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पोलीस पाटील वसंतराव आहेर, तंटामुक्ती अध्यक्ष रामकिशन आहेर, शेषराव पांडववीर, भुरू पठाण, गणेशराव राखोंडे आदींनी परिश्रम घेतले.

Story img Loader