सोलापूर : बार्शी एसटी आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळाने दहा नवीन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे एकीकडे सामान्य प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असताना दुसरीकडे यावरून बार्शीच्या आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहावयास मिळते. राजकीयदृष्ट्या नेहमीच संवेदनशील मानल्या जाणाऱ्या बार्शी तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल आणि त्यांचे पारंपरिक विरोधक माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात अधूनमधून कोणत्या ना कोणत्या कारणावरून संघर्ष सुरूच असतो. आता नवीन दहा एसटी बसेस आणण्यामागे कोणाचा खरा वाटा आहे, यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन बार्शी आगारासाठी नवीन २० एसटी बसेस उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्या वेळी आमदार सोपल यांनी, ‘बार्शीच्या एसटी बसमध्ये बसणे ‘नो गॅरंटी’ सारखे झाले असून वारंवार बंद पडणाऱ्या जुन्या एसटी बसेसची संपूर्ण आपबीती कानावर घातली असता त्याची दखल घेत परिवहनमंत्री सरनाईक यांनी बार्शी आगारात तत्काळ २० नवीन एसटी बसेस मंजूर करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार दहा नवीन एसटी बसेस बार्शी आगारात दाखल झाल्या आहेत. या बसेसचे पूजन आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी आमदार राजेंद्र राऊत यांचीही उपस्थिती होती. नंतर या दोन्ही नेत्यांनी एकत्रपणे नवीन बसमधून सफर करून फेरफटका मारला.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपला शब्द खाली पडू न देता मागणीप्रमाणे तत्काळ नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार दिलीप सोपल यांनी समाधान व्यक्त केले. मात्र माजी आमदार राऊत यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात बार्शी एसटी आगारातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि एसटी बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी आपण पाठपुरावा केला होता. त्यामुळेच प्रस्ताव मार्गी लागून नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्याचा त्यांच्या समर्थकांनी दावा केला आहे. परंतु बार्शी विधानसभा निवडणुकीत सोपन निवडून आल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांतून बार्शी आगाराला नवीन दहा बसेस मिळाल्या. त्याचे श्रेय आमदार सोपल यांना त्यांच्या समर्थकांनी दिले आहे.