सोलापूर : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ घेऊन येणाऱ्या लाखो वारकरी तथा भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुलभ होण्याच्या दृष्टीने दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे १०२ कोटी ७४ लाख रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारणीचे काम दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.
यासंदर्भात गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी असलेल्या व्यवस्थेचा पुनर्विकास करण्याच्या अनुषंगाने दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्यासाठी १२९ कोटी ४९ लाख रुपये किमतीच्या विकासाचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतला होता. त्यानुसार शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (पंढरपूर) दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारणीकरिता १०२ कोटी ७३ लाख ९५ हजार ८८४ रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध केली आहे. या अल्पमुदतीच्या निविदेनुसार पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकरिता उभारल्या जाणाऱ्या दर्शन मंडप व स्काय वॉकचे काम २४ महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे.